आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरजीपीपीएल व कोंकण एल.एन.जी. लिमिटेड कंपनीमध्ये विविध कामांसाठी बाहेरील राज्यांतील कामगारांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कंपनीमध्ये विविध ठेकेदारांच्या माध्यमातून कामावर येणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संपूर्ण माहिती स्थानिक ग्रामपंचायत व संबंधित पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात यावी, तसेच त्यांची आवश्यक ओळख पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे.
आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी सारख्या महत्त्वाच्या विद्युत व गॅस प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती होत करताना सुरक्षा व्यवस्थेला विशेष प्राधान्य देणे आवश्यक आहे. कंपनीच्या परिसरात काम करणारे कामगार कोणत्या राज्यातून आले आहेत, त्यांचा कायमस्वरूपी पत्ता कोणता आहे, त्यांना कोणत्या ठेकेदाराने कामावर घेतले आहे आणि त्यांचे सध्याचे वास्तव्य नेमके कोठे आहे, याबाबत अधिकृत नोंदी उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे जानवळकर यांनी म्हटले आहे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्त्वाच्या…!
औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने कामगार येत असताना स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात योग्य समन्वय असणे आवश्यक आहे. भविष्यात एखादी अनुचित घटना किंवा गुन्हा घडल्यास संबंधित व्यक्तीची ओळख पटविणे, तिचा पत्ता शोधणे आणि तपासाला गती देणे यासाठी कामगारांच्या अधिकृत नोंदी उपयुक्त ठरू शकतात.
परराज्यातून रोजगारासाठी येणाऱ्या प्रत्येक कामगाराकडे संशयाने पाहणे योग्य नसले, तरी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्व कामगारांची नियमानुसार माहिती संकलित करणे ही महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरू शकते. यासाठी कंपनी प्रशासनासह संबंधित ठेकेदारांनी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांवरही जबाबदारी निश्चित करा..!
कंपनीमध्ये कामगार पुरविणाऱ्या प्रत्येक ठेकेदाराने आपल्या कामगारांची अद्ययावत यादी ठेवावी. त्यामध्ये कामगारांचे पूर्ण नाव, मूळ गाव, कायमस्वरूपी पत्ता, ओळखपत्राचे तपशील, सध्याचा राहण्याचा पत्ता आणि संपर्क क्रमांक यांचा समावेश असावा. ही माहिती लागू नियमांनुसार संबंधित यंत्रणांकडे उपलब्ध करून देण्यात यावी.
तसेच कामगार कामावर रुजू होताना आणि काम सोडून जाताना त्यांची नोंद अद्ययावत करण्याची व्यवस्था असावी. कंपनी परिसरातील प्रवेश नियंत्रण, कामगारांचे अधिकृत ओळखपत्र आणि सुरक्षा तपासणी याबाबतही काटेकोर नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत, पोलीस आणि कंपनी प्रशासनाचा समन्वय हवा…!
स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन आणि आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी कंपनी व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामगारांची नोंदणी, ओळख पडताळणी आणि निवासस्थानांची माहिती याबाबत कायद्यानुसार आवश्यक ती कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी.
या प्रक्रियेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर रोजगारासाठी आलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देता येईल.
कंपनी व्यवस्थापनाने गांभीर्याने दखल घ्यावी…!
आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी कंपनी व्यवस्थापनाने कामगार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. कामगारांची अधिकृत माहिती आणि पोलीस पडताळणीसंदर्भात लागू असलेल्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची संबंधित प्रशासनाने खातरजमा करावी.
कंपनीच्या सुरक्षेबरोबरच आसपासच्या गावांतील नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याची भूमिका मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळरकर यांनी मांडली आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे…!
औद्योगिक विकासासोबत परिसरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरजीपीपीएल व कोंकण एलएनजी कंपनीमधील कामगार भरती, कंत्राटदारांकडील कामगारांची माहिती आणि आवश्यक पोलीस पडताळणी या बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात जन आंदोलन करण्यात येईल यांची नोंद प्रवाशांनी घ्यावी










