शासकीय कर्मचारी यांनी आपआपले कर्तव्य बजावुन जबाबदारीने काम केले पाहिजे – सभापती बबन मनवे यांचे प्रतिपादन
& म्हसळा येथे ग्रामपंचायत स्तरावरील चार दिवसांचे प्रशिक्षण संपन्न
श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा – प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सन 2025 - 26, राज्य व्यवस्थपन कक्ष पुणे, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती म्हसळा, श्री मौनी विद्यापीठ गारगोटी यांचे संयुक्त विद्यमाने सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे ग्रामपंचायत स्व उत्पन्नाचे स्रोत याबाबत चार दिवस प्रशिक्षण म्हसळा पंचायत समिती सभागृह, सार्वजनिक वाचनालय सभागृह, आगरी समाज सभागृह मेदडी आणि मराठा भवन सभागृह खामगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षण ठिकाणी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रापं सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गटाच्या सीआरपी, ग्रापं कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाट्न म्हसळा पंचायत समिती सभापती बबन मनवे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सभापती बबन मनवे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी स्वतः वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच गावातिल सर्व घटकांना सोबत घेऊन गाव विकासाचा आराखडा तयार करावा. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, यांचे कामाचे कौतुक करून लहान मुलांना बाळ वयांत चांगले संस्कार देण्याचे कामं अंगणवाडी सेविका करत असून मुलांच्या आरोग्य चांगले राहावे यासाठी आशसेविका मेहनत घेत असतात असे सांगून गाव पातळीवर बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून बचतीची सवय लावून आर्थिक स्रोत कसे वाढवता येईल याबाबत सीआरपी नी मार्गदर्शन केले पाहिजे असे सांगितले. ग्रामपंचायत सोबत निगडित असलेल्या सर्वच शासकीय कर्मचारी यांनी आपआपले कर्तव्य व्यवस्तीत पार पाडून जबाबदारी ने कामं केले तरच शासनाच्या विविध योजना संबंधित लाभार्थी यांचे पर्यंत पोहचवता येतील असे सभापती बबन मनवे यांनी सांगितले.
प्रशिक्षण दरम्यान गाव विकासाच्या ९ थीम
१) गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धी गाव
२) आरोग्यदायी गाव
३) बालस्नेही गाव
४) जलसमृद्ध गाव
५) स्वच्छ आणि हरित गाव
६) स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव
७) सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव
८) सुशासनयुक्त गाव
९) महिला व बालिका अनुकूल गाव
या थीम वर चर्चा करून गावाचा सर्वांगीण विकासासाठी ओएसआर चा वापर करून नाविन्यपुर्ण प्रकल्प, स्व उत्पन्न वाढीसाठी करावयाचे विविध पर्याय इत्यादी विषयांवर सविस्तर अभ्यास करून ग्रामपंचायतिचे कर व करेतर उत्पन्न वाढविन्याचे स्रोत कोण कोणते आहेत, गावाचा सर्वांगीण विकास करताना कोणत्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी विभाग, अशा महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मौनी विद्यापीठ गारगोटी, कोल्हापूर येथील प्राध्यापक व्ही.व्ही.चौगुले तसेच यशदा चे मास्टर ट्रेनर कमलेश कोरपे, विनोद कोरपे, सीताराम कडू यांनी मार्गदर्शन केले.
सभापती बबन मनवे, उप सभापती लहू म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, पस सदस्या प्रियांका निंबरे, समृद्धी चाचले, गटविकास अधिकारी मंगेश साळी, विस्तार अधिकारी दामोदर दिघिकर, कक्ष अधिकारी हेमंत माळी, जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, आरोग्य विस्तार अधिकारी पाटील, विस्तार अधिकारी अजय खराडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खोत, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गाणेकर यांनी भेट देऊन सहभागी प्रशिक्षणार्थी यांचे कौतुक केले.











