अखंड आगरी समाज व संकल्प फाउंडेशनचा संयुक्त पुढाकार; बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शन
श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धन : अखंड आगरी समाज वडवली यांच्या सहकार्याने संकल्प फाउंडेशनच्या वतीने गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा गुणगौरव सोहळा तसेच बांधकाम कामगारांसाठी कल्याणकारी योजनांची माहिती देणारे मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. वडवली आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आगरी समाजाचे अध्यक्ष सुरेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष अवटी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कामगारांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत त्याचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास सत्कारमूर्ती, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बांधकाम कामगार तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत गुणवंतांचा सन्मान आणि कामगारांना योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आल्याने कार्यक्रमाचे विशेष महत्त्व ठरले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक पाटील, सतीश कांबळे, मयूर गुहागरकर, निलेश नाकती, मैत्री फाउंडेशन तसेच अखंड आगरी समाजाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. संकल्प फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष ॲड. जयदिप तांबुटकर यांनी सर्व उपस्थितांचे व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आभार मानले.








