“पाच वर्षांपासून 35 गायींचा स्वखर्चाने सांभाळ.!”
गुहागर – पोमेंडीच्या सिद्धेश खानविलकर यांची गोसेवेच्या माध्यमातून वसुबारस
आबलोली (संदेश कदम)
दिवाळीच्या पहिल्या दिवशी गायींची विधिवत पूजा,, गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करत तरुणाने जपली परंपरा
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस! भारतीय संस्कृतीत या दिवसाला विशेष महत्त्व असून गायीची पूजा करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. याच परंपरेला गोसेवेची जोड देत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पोमेंडी येथील सिद्धेश खानविलकर या तरुणाने वसुबारस साजरी केली. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून सिद्धेश स्वखर्चाने तब्बल 35 गायींचा सांभाळ करत आहे. केवळ वसुबारसेपुरती पूजा न करता वर्षभर गायींचे संगोपन करण्याचा त्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरत आहे. वसुबारसेचे औचित्य साधून त्याने सर्व गायींची विधिवत पूजा केली. त्यांना ओवाळून आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करून दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा आनंद साजरा केला. सण-उत्सवांच्या काळात गोमातेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सिद्धेशच्या या गोसेवेचे परिसरातून कौतुक होत आहे.











