म्हसळेकरांना मिळाली अभंग भक्तिरसाची मेजवानी,
दिवाळी महोत्सव उत्साहात संपन्न
खासदार सुनील तटकरे,वरदा वहिनी तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रंगली अभंग-भक्तिगीतांची सुरेल मैफल
म्हसळा – प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
दिवाळी सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दाजी विचारे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा येथील कन्या शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी महोत्सवात म्हसळेकरांना अभंग आणि भक्तिसंगीताची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळाली.’अभंग रिपोस्ट’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिरसात चिंब भिजला.खासदार सुनील तटकरे,वरदा वहिनी आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी खासदार सुनील तटकरे,वरदा वहिनी आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वीज कळ दाबून श्री धावीर मंदिर तसेच कार्यक्रमस्थळ परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाईचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आयोजित रांगोळी प्रदर्शनाची मान्यवरांनी पाहणी केली.प्रसिद्ध छायाचित्रकार विलास रहाटे यांनी आठवणीतले दिवंगत अजितदादा पवार यांचे हुबेहूब छायाचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारले होते.हे छायाचित्र पाहून खासदार सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे भावूक झाले.त्यांनी विलास रहाटे यांच्या कलाकृतीचे विशेष कौतुक केले.त्यानंतर दीपप्रज्वलन करून ‘शुभ दीपावली’ सेल्फी पॉइंटचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर ‘अभंग रिपोस्ट’ या सांगीतिक कार्यक्रमात अभंग, भक्तिगीते आणि सुरेल संगीताच्या माध्यमातून कलाकारांनी उपस्थितांना भक्तिरसाचा आनंद दिला.खासदार सुनील तटकरे आणि त्यांचे कुटुंबीय संपूर्ण कार्यक्रमाला शेवटपर्यंत उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. म्हसळेकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संगीत मैफलीचा मनमुराद आस्वाद घेतला.
कार्यक्रमानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना खासदार सुनील तटकरे,मंत्री आदिती तटकरे आणि वरदा वहिनी यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमातील कलाकार आणि रांगोळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे मान्यवरांनी कौतुक करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.उपस्थित प्रेक्षकांसाठी कूपनद्वारे लकी ड्रॉ आयोजित करून आकर्षक बक्षिसांचे वितरणही करण्यात आले.मंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे आणि दाजी विचारे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे खासदार सुनील तटकरे यांनी कौतुक केले. म्हसळ्यातील पुढील कार्यक्रम आपण स्वतःआयोजित करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.या महोत्सवात मंत्री आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करून विशेष उपस्थिती दर्शविली.जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.भक्तिसंगीत,कलाविष्कार, आकर्षक रोषणाई आणि दिवाळीच्या उत्सवी वातावरणामुळे म्हसळ्यातील हा दिवाळी महोत्सव उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.











