ग्रामीण लेकरांच्या स्वप्नांना आधुनिक तंत्रज्ञानाचे पंख: उणेगाव शाळेत ‘व्हर्च्युअल क्लासरूम’चे दिमाखात लोकार्पण
राम भोस्तेकर -माणगाव
“उंच भरारी घेण्यासाठी पंखांत बळ हवे ज्ञानाचे, डिजिटल युगात घडू दे भविष्य आमच्या ग्रामीण बालकांचे!” या ध्येयमंत्राला प्रत्यक्ष कृतीची जोड देत, माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट प्राथमिक शाळा, उणेगाव येथे आधुनिक ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ (डिजिटल वर्गखोली) चा भव्य लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात व भावस्पर्शी वातावरणात संपन्न झाला. ग्रामीण मातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रस्नेही शिक्षणाची कवाडे खुली करून देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
या अत्याधुनिक डिजिटल वर्गखोलीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि ३६०° प्रोडक्शनचे संचालक संतोष शिंदे यांनी अत्यंत मोलाचा ‘इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्ड’ भेट दिला, तर सध्या सौदी अरेबिया येथे कार्यरत असणारे माजी विद्यार्थी जयदास नारायण सत्वे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाच डिजिटल टॅब सप्रेम भेट दिले. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मातृसंस्थेचे ऋण फेडण्यासाठी दाखवलेले हे दातृत्व संपूर्ण सोहळ्यात उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू तरळवणारे ठरले.
या सोहळ्याचे शानदार उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती माणगावच्या उपसभापती मनिषा मालोरे,पचायत समिती सदस्या स्वाती करकरे, उणेगावच्या प्रथम नागरिक सरपंच शुभांगी शिर्के, गटशिक्षणाधिकारी प्रसाद पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख कुमार खामकर, ग्रामपंचायत सदस्य, शालेय सर्व समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती माणगावचे सभापती विलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश हरवंडकर तसेच गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमास आणि शाळेच्या प्रगतीस मनापासून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे, यापूर्वीही शाळेचे ऐतिहासिक दस्तऐवज सुरक्षित राहावेत म्हणून जि. प. सदस्य दिनेश हरवंडकर यांनी जनरल रजिस्टर लॅमिनेशन करण्यासाठी ₹५०,०००/- ची महत्त्वपूर्ण मदत दिली होती, त्याबद्दलही त्यांच्या दातृत्वाचा गौरव करण्यात आला. तसेच सरपंच शुभांगी शिर्के यांनी शाळेच्या समृद्धीसाठी ₹४,०००/- ची रोख देणगी व सुंदर परिसरासाठी बागकाम साहित्य सुपूर्द करून शाळेप्रती आपली आपुलकी व्यक्त केली.
शाळेच्या या शैक्षणिक यज्ञात सढळ हाताने योगदान देणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचा, माजी विद्यार्थ्यांचा आणि देणगीदारांचा शाळा परिवाराच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन अत्यंत आदरपूर्वक ऋण व्यक्त करण्यात आले.
माणगाव तालुक्यातील एक सुंदर, निसर्गरम्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून उणेगाव शाळेने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करणारी तसेच नावीन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारी ही शाळा पाहून उपस्थित सर्व मान्यवरांनी मनस्वी समाधान व्यक्त केले आणि ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य निष्ठेने करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनापासून भरभरून कौतुक केले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जेव्हा लोकसहभाग आणि माजी विद्यार्थ्यांच्या प्रेमातून अशा हायटेक सुविधांनी सज्ज होते, तेव्हा गावातील प्रत्येक मूल आत्मविश्वासाने नव्या युगाचे नेतृत्व करण्यास सक्षम बनते, असा विश्वास यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आणि कृतज्ञता व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आकर्षक दीपावलीच्या शुभेच्छा देणारी सुंदर भेटकार्ड्स (Greeting Cards) देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. लहानग्यांच्या या निरागस आणि प्रेमळ भावस्पर्शी स्वागताने उपस्थित पाहुणे भारावून गेले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत उणेगाव, आजी-माजी शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा विकास समिती, माजी विद्यार्थी संघ, केंद्रस्तरीय सर्व शिक्षकवृंद, समस्त पालकवर्ग व ग्रामस्थांनी एकजुटीने परिश्रम घेतले. आपल्या चिमुकल्या हातांनी डिजिटल बोर्ड आणि टॅब हाताळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि नवा आत्मविश्वास या लोकार्पण सोहळ्याचे खरे फलित ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी शाळा परिवाराच्या वतीने सर्व देणगीदार, मान्यवर आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.










