शासन निर्णय (GR) निर्गमित करण्याची मागणी; पालकमंत्री उदय सामंत यांना विविध संस्था व संघटनांच्या वतीने निवेदन
आबलोली (संदेश कदम)
मुंबईचे शिल्पकार, भारतीय रेल्वेचे जनक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे थोर समाजसुधारक जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांची जयंती व पुण्यतिथी शासनाच्या वतीने अधिकृतरीत्या साजरी करण्यात यावी, तसेच यासंदर्भात शासन निर्णय (GR) निर्गमित करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. याबाबत सुवर्णकार संघ, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, चिपळूण, नारी सन्मान प्रतिष्ठान आणि दैवज्ञ समाज यांच्या वतीने राज्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
नाना शंकरशेट यांनी मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक विकासामध्ये ऐतिहासिक योगदान दिले आहे. शिक्षणाचा प्रसार, स्त्रीशिक्षणाला प्रोत्साहन, सार्वजनिक संस्थांची उभारणी तसेच भारतीय रेल्वेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा देशाच्या प्रगतीतील महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातो. दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाची भावना या गुणांच्या बळावर त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. मात्र, एवढे मोठे योगदान असूनही त्यांच्या कार्याची अपेक्षित प्रमाणात दखल घेतली गेली नाही, ही खेदाची बाब असल्याची भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
इतिहास घडविणाऱ्या अशा महान व्यक्तिमत्त्वाची जयंती आणि पुण्यतिथी केवळ काही सामाजिक संस्था किंवा संघटनांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या माध्यमातून साजरी व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासन निर्णय निर्गमित झाल्यास शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये नाना शंकरशेट यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. त्यांच्या विचारांचा, सामाजिक कार्याचा आणि दूरदृष्टीचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
महापुरुषांचे योगदान आणि त्यांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. नाना शंकरशेट यांना शासनस्तरावर योग्य सन्मान मिळावा, त्यांच्या ऐतिहासिक कार्याची अधिकृत दखल घेतली जावी आणि त्यांची जयंती व पुण्यतिथी राज्यभर साजरी करण्यासाठी तातडीने शासन निर्णय निर्गमित करावा, अशी आग्रही विनंती पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरसेवक विक्रांत लवेकर, प्रियांका कारेकर, प्रभाकर कारेकर, विशाखा उतेकर, पूर्वा तांदळे, तृप्ती कदम, सुकन्या चव्हाण, पल्लवी पालकर, अर्चना कारेकर, प्रतीक्षा हळवंडे आदी उपस्थित होते.










