प्रवासी, विद्यार्थी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय; शिवसेना माणगाव तालुकाप्रमुखांची आगार व्यवस्थापकांकडे मागणी
माणगाव, प्रतिनिधी : लोणेरे येथील बसथांब्यावर न थांबता अनेक एसटी बसेस थेट पुलावरून जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. या बसेस पुलाखालील सर्व्हिस रोडवरून नेऊन लोणेरे बसथांब्यावर थांबविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माणगाव तालुकाप्रमुखांनी एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोणेरे येथे एसटी बसने प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना बसेस बसथांब्यावर उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बसेस पुलावरून पुढे जात असल्याने बसथांब्यावर प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित बसेस पुलावरून न नेता पुलाखालील सर्व्हिस रोडवरून वळविण्यात याव्यात. तसेच लोणेरे बसथांब्यावर थांबा देण्याबाबत संबंधित चालक व वाहकांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
महाड ते मुंबई तसेच मुंबई ते महाड या दोन्ही दिशांनी धावणाऱ्या सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना लोणेरे येथे थांबा देण्यात यावा, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील प्रवाशांना एसटी सेवेचा लाभ मिळण्यास मदत होईल.
एसटी प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिवसेना माणगाव तालुकाप्रमुखांनी केली आहे. निवेदनात परिवहनमंत्री, महाड परिवहन विभाग आणि माणगाव येथील वाहतूक निरीक्षक यांना प्रत देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे,माणगाव शहर प्रमुख अजिंक्य जाधव, युवा सेना विभाग प्रमुख अनिष बामणे युवा शहर प्रमुख काते, व सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या सखेने उपस्थित होत









