परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होणार
श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत हरिहरेश्वर पोलीस चौकीचे उद्घाटन गुरुवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलीस अधीक्षक, रायगड श्रीमती आँचल दलाल भा.पो.से. यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास अपर पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग अभिजीत शिवथरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन विभाग राजू सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्यासह श्रीवर्धन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
हरिहरेश्वर हे श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाचे पर्यटन व धार्मिक स्थळ असल्याने येथे वर्षभर पर्यटक तसेच भाविकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर हरिहरेश्वर येथे स्वतंत्र पोलीस चौकी सुरू झाल्याने परिसरातील कायदा-सुव्यवस्था, पर्यटकांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची तातडीची मदत अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
नवीन पोलीस चौकीमुळे हरिहरेश्वर परिसरातील नागरिक तसेच पर्यटकांना पोलिसांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही या सुविधेला महत्त्व प्राप्त झाले आहे.








