वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांचा अनोखा उपक्रम; ठाणाळे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, क्रीडा गणवेश व स्नेहभोजनाचे वाटप
सुधागड : प्रतिनिधी
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आदर्श उपक्रम सुधागड-पाली पंचायत समितीचे वरिष्ठ विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांनी राबविला. दि. १० ऑक्टोबर रोजी आपल्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी नाडसूर केंद्रातील रायगड जिल्हा परिषद शाळा, ठाणाळे येथे विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश, वह्या, पुस्तके, लेखन साहित्य, पेन आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका संच देण्यात आले. तसेच विद्यार्थी व पालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमातील विशेष बाब म्हणजे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थी युवराज पवार याच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत करण्याची जबाबदारी साबळे कुटुंबाने स्वीकारली. या संवेदनशील निर्णयामुळे उपस्थितांनी साबळे कुटुंबाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला साबळे यांचे आई-वडील, पत्नी संगीता साबळे, नाडसूर केंद्रप्रमुख अमोल पाटील, विविध केंद्रांचे केंद्रप्रमुख, शिक्षक, मुख्याध्यापिका आशाताई इप्पर, सहाय्यक शिक्षक प्रकाश आंधळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सादुराम बांगारे यांनी नवनाथ साबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
“वाढदिवस स्वतःसाठी साजरा केला तर आनंद मिळतो; पण तोच वाढदिवस एखाद्या विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी साजरा केला, तर त्या आनंदाला आयुष्यभराचा अर्थ मिळतो,” या विचाराला कृतीत उतरवत नवनाथ साबळे यांनी शिक्षणाप्रती सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला.
आमच्या शाळेतील इयत्ता दुसरी च्या युवराज पवार या विद्यार्थ्याला साबळे साहेबांनी शिक्षण सुरू असेपर्यंत या विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचे आश्वासन देऊन साबळे कुटुंबाने विद्यार्थ्याला दत्तक घेतले आहे. माझ्या शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अतिशय हलायची आहे . परंतु त्या विद्यार्थ्यांची शिकण्याची उमेद खूप चांगल्या प्रमाणात आहे. आजच्या उपक्रमामुळे नाडसुर केंद्रातील सर्वांना च अजून जादा काम करण्याची अजून प्रेरणा मिळाली आहे.
मुख्याध्यापक
आशाताई बालाजी इप्पर
रायगड जिल्हा परिषद शाळा ठाणाळे












