गणरायाच्या आरासीतून कोलथरकर कुटुंबाने जपली मातीशी जोडलेली संस्कृती; भाविक झाले क्षणभर जुन्या काळात
श्रीवर्धन प्रतिनिधी :lसोपान निंबरे
गणेशोत्सव म्हणजे केवळ सजावट, रोषणाई आणि उत्साह नव्हे; तर आपल्या मातीशी, संस्कृतीशी आणि जुन्या आठवणींशी पुन्हा एकदा जोडून घेण्याचा उत्सव आहे. याच भावनेचा सुंदर प्रत्यय भेंडखोल, हरिहरेश्वर दक्षिणकाशी येथील रंजन कोलथरकर यांच्या निवासस्थानी साकारलेल्या गणेशाच्या आरासीतून आला आहे.
श्रीगणरायाच्या आरासीत येथे वारली घराची प्रतिकृती साकारण्यात आली असून, पूर्वीच्या काळातील घरांची रचना, साधेपणा आणि पारंपरिक वातावरण अत्यंत सुबकपणे मांडण्यात आले आहे. आरास पाहताना जुन्या घरांची आठवण, अंगणातील आपलेपणा आणि त्या काळातील साधे-सोपी जीवनशैली डोळ्यांसमोर उभी राहते.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही आरास केवळ सजावट ठरत नाही, तर क्षणभर वर्तमान विसरून जुन्या काळात घेऊन जाणारा एक सुंदर अनुभव ठरत आहे. आजच्या आधुनिक धावपळीच्या जीवनात हरवत चाललेल्या अनेक आठवणी या आरासीतून पुन्हा जिवंत झाल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, या आरासीतून मोठेपणा दाखविण्यापेक्षा आपली संस्कृती जपण्याचा आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिसून येतो. जुन्या पद्धतीचे घर, त्यातील बारकावे आणि पारंपरिक मांडणी यामुळे ही आरास पाहणाऱ्यांच्या मनात नकळत आपुलकी निर्माण करते.
या संपूर्ण प्रयत्नामागची भावना मात्र अतिशय साधी आहे. श्री गणरायाच्या चरणी उभे राहून कोलथरकर कुटुंबाने कोणतीही मोठी मागणी केलेली नाही. त्यांच्या मनातील प्रार्थना केवळ एवढीच
“बाप्पा, मागणं काही नाही…
फक्त आमच्या प्रयत्नांना तुझी साथ दे.
आमच्या कष्टांना तुझा आशीर्वाद दे
आणि आमच्या घरात सुख-समाधान कायम ठेव.”
भक्ती, संस्कृती, साधेपणा आणि जुन्या आठवणींचा सुंदर संगम घडविणारी ही वारली घराची आरास त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ‘बाप्पाच्या दर्शनासोबत जुन्या काळाच्या आठवणींचेही दर्शन’ घडवून देत आहे.








