लीलाधर खोत स्मृती शिष्यवृत्तीअंतर्गत प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान
श्रीवर्धन प्रतिनिधी सोपान निंबरे : गौरी-गणपतीच्या उत्सवाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवत हरिहरेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कुमारी संस्कृती श्रुती राजकुमार कोलथरकर हिला ‘लीलाधर खोत स्मृती शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली.
श्री. दुर्वेश लीलाधर खोत यांच्या वतीने संस्कृती कोलथरकर हिला रोख रुपये १ हजार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. खोत कुटुंबीयांचे प्रतिनिधी तसेच नरेश पुलेकर गुरुजी यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्कृती हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून मेहनत, गुणवत्ता आणि जिद्दीला पाठबळ मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
उत्साही भजन मंडळ, भेंडखोल येथील सर्व प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.








