सायली शक्ती तुरा ग्रुपने गवरी-गणपती उत्सवात जपला पारंपरिक शक्ती-तुरा नाचाचा वारसा
श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धन : गवरी-गणपतीच्या मंगलमय उत्सवात कोकणातील पारंपरिक लोककला आणि सांस्कृतिक परंपरांना विशेष महत्त्व असते. याच परंपरेचा वारसा पुढे नेण्याचे काम श्रीवर्धन शहरातील जीवनेश्वर कोंड येथील सायली शक्ती तुरा ग्रुप या मुलींच्या समूहाकडून केले जात आहे. पारंपरिक वेशभूषेत एकत्र येत या मुली कोकणातील पारंपरिक पद्धतीने ‘नाच’ सादर करून लोककलेचे जतन करत आहेत.
गवरी-गणपती उत्सवानिमित्त या समूहाकडून जीवनेश्वर कोंड तसेच सोळा गणपती गवरी येथे शक्ती-तुरा नाचाचे विशेष प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय श्रीवर्धन शहरातील विविध ठिकाणीही त्यांनी आपल्या पारंपरिक नृत्याचे सादरीकरण केले असून, त्यांच्या नृत्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
आधुनिक मनोरंजनाच्या काळात पारंपरिक लोककला हळूहळू मागे पडत असताना, नव्या पिढीतील मुलींनी आपल्या मातीतली कला आत्मसात करून ती जपण्याचा घेतलेला पुढाकार विशेष उल्लेखनीय ठरत आहे. पारंपरिक वेशभूषा, नृत्याची लय आणि कोकणच्या संस्कृतीशी जोडलेली ही कला उत्सवाला वेगळेच सांस्कृतिक सौंदर्य प्राप्त करून देत आहे.
गवरी-गणपतीच्या उत्सवातून केवळ धार्मिक परंपराच नव्हे, तर कोकणची लोकसंस्कृती, लोककला आणि पारंपरिक नृत्याची ओळखही पुढील पिढीपर्यंत पोहोचत आहे. सायली शक्ती तुरा ग्रुपच्या या उपक्रमामुळे श्रीवर्धनच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळत असून, लोककलेचा वारसा जपण्याचा सुंदर संदेशही दिला जात आहे.
फोटो कॅप्शन :
गवरी-गणपती उत्सवानिमित्त जीवनेश्वर कोंड व सोळा गणपती गवरी येथे पारंपरिक शक्ती-तुरा नाच सादर करणाऱ्या सायली शक्ती तुरा ग्रुपच्या मुली.








