जिजामाता हायस्कूलमध्ये मान्यवरांचा सन्मान
म्हसळा – प्रतिनिधी
श्रीकांत बिरवाडकर
जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संचलित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे-आगरवाडा येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक महादेव पाटील,जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे,अनिल बसवत,सभापती बबन मनवे, उपसभापती लहूशेठ म्हात्रे,पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले,प्रियांका निंबरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना समीर बनकर यांनी मोबाईलचा वापर केवळ गरजेपुरता करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले तर अभिषेक विचारे यांनी शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करून ज्ञान,कौशल्य आणि कर्तृत्वाच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. संस्थापक महादेव पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक वाटचालीची व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभागप्रमुख अंकुश गाणेकर यांनी मानले.











