घूम येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेतुन वनराई बंधारे
पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करणे गरजेचे आहे – सभापती बबन मनवे
घूम येथे ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधले बंधारे
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून त्याचे जमिनीत पुनर्भरण करण्याच्या उद्देशाने म्हसळा तालुक्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला चालना मिळत आहे.
म्हसळा
तालुक्यातील ग्रामपंचायत घूम – रुद्रवट हद्दीतील घूम गावाचे नदीला तीन ठिकाणी वनराई बंधारे बांधन्यात आले असून जलसंवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. बदलत्या पर्जन्यमानामुळे पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात नैसर्गिक जलस्रोतांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा भविष्यात उपयोग व्हावा या उद्देशाने वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली जात आहे. स्थानिक परिस्थितीनुसार असे बंधारे उभारल्यास जमिनी मधील पाणी पातळी वाढण्यास,परिसरातील जलस्रोत टिकवून ठेवण्यास तसेच उन्हाळ्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होऊ शकते.
ग्रामपंचायत घूम रुद्रवट हद्दीतील मौजे
घूम येथे वनराई बंधारा उभारणीच्या निमित्ताने पंचायत समितीचे सभापती बबन मनवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन सांगितले कि पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून मानवी जीवन,शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे.त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. उन्हाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येक गावाने आतापासूनच जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पुर्वापार असलेले पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करून ठेवणे काळाची गरज आहे असे सांगून केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता ग्रामस्थ,सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन वनराई बंधारा उभारणीच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन सभापती बबन मनवे यांनी केले.
ग्रामस्थांनी एकजूटीने श्रमदान करून बंधारे बांधले असल्याने कौतुक केले. पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम प्रत्यक्षात पूर्ण करून माणसांबरोबरच येथील जंगल परिसरातील प्राणी, पशु, पक्षी यांच्या देखील पिण्याचे पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल असे सांगितले. तसेच पाणी टंचाईच्या काळातही सक्षम जलस्त्रोत निर्मिती व्हावी हे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या गावामध्ये नागरिकांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे याबद्दल कौतुक करून पावसाळी हंगाम संपल्यानंतर ज्या नाले व ओढ्यामधून पाण्याचा प्रवाह चालू असतो, अशा नाला/ओढातील पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने अडवून पाण्याचा साठा केला जातो. या अडवलेल्या पाण्याचा बिगर पावसाळी हंगामामधे वापर करून पाणी टंचाईवर काही अंशी प्रमाणात मात करता येते. या व्यतिरिक्त गावातील मुक्या जनावरांना देखील प्रखर पाणीटंचाईच्या काळात या बंधार्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध होत असल्याची माहिती गटविकास अधिकारी मंगेश साळी यांनी दिली.
लोकसहभागातून उभारण्यात येणारे वनराई बंधारे ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
याच कार्यक्रम दरम्यान गावात जलजिवन् मिशन योजनेचे काम झाले असल्याने जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सभापती बबन मनवे, उपसभापती लहू म्हात्रे, गटविकास अधिकारी मंगेश साळी, पस सदस्या समृद्धी चाचले, सरपंच तथा उपसरपंच श्रीकांत बिरवाडकर, पाणी पुरवठा अधिकारी अनिता लवटे, निरंजन कुवर, गाव अध्यक्ष मधुकर गायकर, ग्राप सदस्य किसन गायकर, मयूर गायकर, अनिता रिकामे, मनस्वी गायकर यांसह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.











