माणगाव, दि. २२ (प्रतिनिधी) : शिक्षा संस्कृति उत्थान न्यास व माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने द. ग. तटकरे महाविद्यालयातील बी.एम.एस. (प्रबंधन अध्ययन स्नातक) विभागातर्फे ‘भारतीय शिक्षण दिन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा सामाजिक उपक्रमही राबविण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचे कुलसचिव डॉ. अमित शेष होते. प्रमुख वक्त्या म्हणून शिक्षा संस्कृति उत्थान न्यास (कोकण प्रांत)च्या संयोजिका डॉ. मनप्रीत कौर यांनी ‘शिक्षा संस्कृति उत्थान न्यास एवं न्यास के विविध आयाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच विशिष्ट वक्ते प्रा. श्रीनिवास वारखंडकर यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभ्यासपूर्ण विचार मांडले.प्रभारी प्राचार्य डॉ. जे. आर. पांडेय यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. शिक्षण क्षेत्रातील भारतीय मूल्यांचे महत्त्व, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी याबाबत त्यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र आचार्य, डॉ. संगीता उतेकर, डॉ. बबन सिनगारे, प्रा. दिपेश केकाणे, प्रा. स्वप्नील सकपाळ, प्रा. देवांक परब, प्रा. मंजिरी सावंत यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड. राजीव अशोक साबळे हे कार्यक्रमास प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नसले, तरी त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शक्य झाले. शिक्षणासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचे सातत्यपूर्ण योगदान असून, समाजाभिमुख कार्यासाठी त्यांची ओळख आहे.कार्यक्रमाचे नियोजन बी.एम.एस. विभागप्रमुख प्रा. आयशा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सुष्मिता महामुणकर व प्रा. शाश्वती महाडिक यांनी केले. शेवटी श्री. शेखर ढालपे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कल्याण मंत्र व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.










