माणगाव, प्रतिनिधी
जिथे जीवनाचा शेवटचा प्रवास संपतो, त्याच स्मशानभूमी परिसरात नवजीवनाची हिरवी पालवी फुलविण्याचा प्रेरणादायी उपक्रम पेण येथे राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या स्तुत्य वृक्षारोपण उपक्रमाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
छावा प्रतिष्ठान, बालाजी नर्सरी (माणगाव) तसेच ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
मृत्यूच्या शांत साक्षीदार असलेल्या स्मशानभूमीत आज हिरव्या आशेची बीजे रुजली. भविष्यात हा परिसर वृक्षांच्या सावलीने नटावा, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि पुढील पिढ्यांना स्वच्छ, सुंदर व हिरवेगार वातावरण लाभावे, या उदात्त भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी “एक झाड, एक जीवन” हा संदेश देत वृक्षारोपण ही केवळ जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट असल्याचे सांगितले. लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धारही सर्वांनी व्यक्त केला.
परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले. समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा उपक्रम पेण परिसरासाठी प्रेरणादायी ठरला.
यावेळी छावा प्रतिष्ठानचे संस्थापक निलेश थोरे, अमित ढाकवळ, बालाजी नर्सरीचे प्रो. ओमकार देशमुख, ग्रीन कम्युनिटीज फाउंडेशनचे मॅनेजर मनोहर पाटील, पेण गावचे भाजपा नेते कृष्णा मोंडे तसेच छावा प्रतिष्ठानचे सदस्य सौरभ पांडे, श्रीराम कळंबे, सौ. रुपाली कासारे, समीर बक्कम, नयन पोटले, अमोल पवार, अनिकेत कांबळे, पूजा पवार, पंकज लहाने, सौ. रचना थोरे, परेश सांगळे, राजेश पवार, समीर पवार, सुबोध कासारे, अविनाश सोळंके, राहुल तळकर व इतर सदस्य उपस्थित होते.







