माणगाव (सलीम शेख) :
१०० वर्षांपूर्वी मोर्बा गावातील बुजुर्ग मंडळींनी सुरु केलेल्या मोर्बा सोशल सोसायटी शिक्षण संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करणार असे अभिवचन खा. सुनील तटकरे यांनी मोर्बा येथील संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना दिले. माणगाव तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांपैकी एक ओळखल्या जाणाऱ्या मोर्बा सोशल सोसायटी शिक्षण संस्थेच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मोर्बाच्या सी. एस. आर. फंडातून मंजूर झालेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमीपूजन समारंभ शनिवार दि २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी रायगड रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांच्याहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुशील केकाणे,राजिप सदस्य अस्लम राऊत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काका नवगणे, अल्ताफदादा धनसे,पंचायत समिती उपसभापती मनिषा मालोरे, पं. स. सदस्य अलका केकाणे, शादाब गैबी, राजेंद्र शिर्के,हुसैन रहाटविलकर, गजानन अधिकारी, इकबाल हर्णेकर, नजीर धनसे, आसिफ राऊत, सरपंच शौकत रोहेकर, उपसरपंच झुल्फीखार राऊत, प्रकाश लाड, रज्जाक जळगावकर आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी,सदस्, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना खा. तटकरे पुढे म्हणाले की, मोर्बा सोशल सोसायटी संस्थेच्या हायस्कूल व ज्युनियर कॉलेजसाठी माध्यमातून हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजसाठी आवश्यक असणारे तळमजला व वरच्या मजल्याचे काम चांगल्या प्रकारे करण्यात येईल टप्पा टप्प्याने आपण संस्थेला आवश्यक असणारी सर्व कामे करु. या संस्थेत वाणिज्य शाखा व बीएसआयटीला परवानगी घेऊ यासाठी लागणारी कागद पत्रांची पूर्तता करा. मी पुढील वर्षी २०२७ मध्ये त्यांना मंजुरी मिळवून देतो. या शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेचे नाव जगात,देशात रोशन करावे. या संस्थेच्या शेजारीच असणाऱ्या मॉडर्न इंग्लिश स्कूलला २५ संगणक व इतर साहित्य निश्चित पुरविले जातील असे खा. तटकरे यांनी बोलताना उपस्थितांना आश्वासित करीत शिक्षणाच्या बाबतीत मी असेन,आदिती असेल,अनिकेत असेल आम्ही सर्वजण सहकार्य करू असे सांगितले.आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात बोलताना राजिप सदस्य अस्लम राऊत यांनी सांगितले की, जिल्हा परिषद निवडणूक अगोदर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी खा. तटकरे साहेबांना विविध कामांविषयी विनंती केली होती. त्यापैकी एक काम म्हणजे मोर्बा सोशल सोसायटी शिक्षण संस्थेची नवीन इमारत. या इमारतीचे कामाचा शुभारंभ होताना आज मला आनंद होत आहे.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे तटकरे साहेबांच्यात दिसून येते. यावेळी त्यांनी शिक्षण संस्थेत वाणिज्य शाखा व बीएसआयटी सुरू करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मार्गदर्शक आसफ पल्लवकर सर यांनी केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मौलाना यांनी कुराण पठण करून शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.









