माणगाव प्रतिनिधी
लहानपणी रुजवलेले संस्कार आणि सवयी मुलांचे भविष्य घडवत असतात. याच विचारातून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच आर्थिक साक्षरता, नियोजन आणि बचतीचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने रायगड जिल्हा परिषदेच्या उणेगाव शाळेमध्ये ‘जादुई गुल्लक’ या नाविन्यपूर्ण व भावस्पर्शी उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत आकर्षक लाकडी गुल्लकचे वाटप करून बचतीचे पहिले धडे देण्यात आले.
‘जादुई गुल्लक’ ठरतेय जीवनकौशल्यांची पाठशाळा ‘जादुई गुल्लक’ ही केवळ पैसे साठवणारी पेटी नसून, ती लहानग्यांच्या स्वप्नांना पंख देणारी आणि त्यांच्यात निर्णयक्षमता रुजवणारी एक सुंदर संकल्पना आहे. रोज मिळणाऱ्या खाऊच्या पैशांमधून किती खर्च करायचा आणि भविष्यातील स्वप्नांसाठी किती साठवायचे, याचे नियोजन मुले स्वतः शिकत आहेत. या लहानशा सवयीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितलेल्या जीवनकौशल्यांचा मुलांमध्ये नैसर्गिकरीत्या विकास होण्यास मदत होत आहे.
या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, काही महिन्यांनंतर मुलांनी स्वतः साठवलेली ही रक्कम थेट त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे मुलांना केवळ बचतच नाही, तर प्रत्यक्ष बँक व्यवहार, पासबुक, चलन भरणे यांसारख्या आर्थिक घडामोडींचे प्रत्यक्ष ज्ञान (Practical Knowledge) मिळणार आहे. स्वतःच्या घामाच्या व निसटत्या खाऊच्या पैशांतून साचलेली रक्कम जेव्हा खात्यात दिसेल, तेव्हा मिळणारा आनंद आणि आत्मविश्वास मुलांसाठी खऱ्या अर्थाने ‘जादुई’ आणि प्रेरणादायी ठरणार आहे.
‘जादुई गुल्लक’ संकल्पनेचे प्रणेते प्रसादजी शिरसीकर सर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा सुंदर उपक्रम पार पडला. यासाठी विस्तार अधिकारी तथा केंद्र प्रमुख कुमारजी खामकर सर यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
आपल्या चिमुकल्या हातात लाकडी गुल्लक मिळताच विद्यार्थ्यांनी ते आनंदाने डोक्यावर उंचावून जल्लोष केला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील तो निर्व्याज आनंद पाहून उपस्थितांचे डोळे कौतुकाने भरून आले. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे रायगड जिल्ह्यातील उणेगाव शाळेने आपल्या ‘उत्कृष्ट शाळा’ या लौकिकात पुन्हा एकदा सोन्याचे पान जोडले आहे.










