माणगाव प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा उणेगाव येथे ‘वृक्ष दिंडी’ आणि वृक्षारोपण सोहळा अत्यंत उत्साहात, भक्तीमय व प्रबोधनात्मक वातावरणात साजरा करण्यात आला. वारकरी संप्रदायाच्या परंपरेला निसर्ग संवर्धन आणि सामाजिक जाणिवांची जोड देत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या अनोख्या उपक्रमाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
पारंपरिक वारकरी वेशभूषेत नटलेल्या विद्यार्थ्यांनी डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात झाडांची रोपे आणि खांद्यावर पालखी घेऊन गावातून भव्य दिंडी काढली. “जय जय राम कृष्ण हरी”, “तुझ्या कीर्तनात झालो आणि माणसात आलो” आणि “आधी पताका घेऊनी वारी बघा निघाली” अशा टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि भजनांच्या सुरांनी संपूर्ण उणेगाव परिसर भक्तीमय झाला होता.
केवळ वृक्षारोपणाचा संदेश न देता समाजात पसरलेल्या भीषण समस्यांवर बोट ठेवत विद्यार्थ्यांनी हातात प्रबोधनात्मक फलक धरून पांडुरंगाकडे खालीलप्रमाणे साकडे घातले: “ना कर्जाचा फास, ना आत्महत्येचा टाहो… पांडुरंगा, बळीराजाच्या घरात फक्त आनंदाचा सोहळा राहो!” “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” आणि “प्रत्येक लेकराच्या हातात दे शिक्षणाची शिदोरी” असा संदेश देणारे फलक चिमुकल्यांनी हाती धरले होते. “हातात पदवी, डोळ्यात आस… देवा, सुटू दे बेरोजगारीचा फास” तसेच पेपर फुटीच्या पापाला कायमची मूठमाती देण्याची विनंती विठूमाऊलीकडे करण्यात आली.व्यसनमुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि देशातील भ्रष्टाचाराची वारी थांबवून प्रामाणिकपणाची वारी आणण्याचे आवाहन करण्यात आले.नराधमांच्या मनात कायद्याची दहशत निर्माण करण्याची मागणी करत “झाडे तोडून नका करू निसर्गाचा अंत… हीच शिकवण देतील तुका-ज्ञानेश्वर संत!” या संदेशातून पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
शाळेच्या या नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून, ही वृक्ष दिंडी केवळ एक धार्मिक उत्सव न राहता समाजाला अंतर्मुख करणारी प्रबोधनाची वारी ठरली.










