माणगाव | प्रतिनिधी
तब्बल ५३ तासांच्या आमरण उपोषणानंतर अखेर महसूल आणि नगरपंचायत प्रशासनाने पत्रकार प्रसाद गोरेगांवकर यांच्या मागण्यांची दखल घेतली. तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बोजा वसुलीच्या नोटिसा काढण्यात येतील, असे आश्वासन दिले. तर नगरपंचायत प्रशासनाने इन्फिनिटी बिल्डकॉन या इमारतीला दिलेले OC आणि लॉजिंगसाठी दिलेली नाहरकत रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर गोरेगांवकर यांनी उपोषण मागे घेतले.
दरम्यान, कोस्ते येथील राजाभाऊ रणपिसे, वहाब डावरे आणि सीताराम शिर्के यांच्या प्रकरणात वसुलीच्या नोटिसा काढण्यात येतील, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, ज्या-ज्या ठिकाणी विनारॉयल्टी उत्खनन अथवा विनापरवानगी भराव झालेला आहे, अशा सर्व प्रकरणांची पाहणी करून संबंधितांना नोटिसा बजावण्यात येतील आणि शासन नियमानुसार संबंधित जमिनीवर बोजा चढविण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन महसूल प्रशासनाने दिले आहे.माणगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या विविध प्रश्नांवर प्रशासनाने कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने ५३ तासांच्या आंदोलनाची सांगता झाली.
आता प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत आणि किती वेगाने होते, याकडे माणगाव तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नोटिसा कधी निघणार, बोजा कधी चढविला जाणार आणि इन्फिनिटी बिल्डकॉनचे OC व लॉजिंग NOC प्रत्यक्षात कधी रद्द होणार, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे.आश्वासनांनंतर उपोषण स्थगित झाले असले तरी प्रशासनाच्या पुढील कार्यवाहीवर या संपूर्ण प्रकरणाची दिशा ठरणार आहे.








