माणगाव प्रतिनिधी
दहिवली, ता. माणगाव येथे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नवतरुण मित्र मंडळ, दहिवली यांच्या वतीने सलग चौथ्या वर्षी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्री काळभैरव मंदिर, दहिवली येथे आयोजित करण्यात आलेला हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गावचे पोलीस पाटील चंद्रकांत चेरफळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रा. जि. प. मराठी शाळा, दहिवली येथील विद्यार्थ्यांनी सुरेल आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर नवतरुण मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केलेल्या कुमार विराज अशोक करकरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत यश संपादन करावे, असा संदेश या गुणगौरव सोहळ्यातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चेरफळे, सचिन उभारे, श्रद्धा अंबुर्ले, माजी केंद्रप्रमुख रमेश मोरे व समीर चेरफळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास, मेहनत, शिस्त व सातत्याच्या जोरावर आपल्या जीवनात यश संपादन करावे, असे आवाहन करत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी दहिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मुमताज बंदरकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेश सत्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयेंद्र सत्वे, उपाध्यक्ष शैलेश करकरे, टी. एस. भोस्तेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, दहिवली मराठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने नवतरुण मित्र मंडळाकडून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवतरुण मित्र मंडळाचे अंकेश डवले, सुहास करकरे, विष्णू तळवटकर तसेच मंडळाच्या अन्य सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता पहिली ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याची सांगता झाली.








