संभे गोविंदा पथकाची सात थरांची सलामी
लाखाचे बक्षीस पटकावले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवात थरार
बालगोविंदा इरा सानप ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या धर्तीवर म्हसळ्यातही यंदा भव्य-दिव्य दहीहंडी उत्सवाचा थरार अनुभवायला मिळाला. म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तथा भास्कर दाजी विचारे फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात संभे गोविंदा पथकाने तब्बल सात थरांची यशस्वी सलामी देत १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. पन्हाळगड गोविंदा पथकाने सहा थरांची सलामी देत ११ हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.
खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते दहीहंडी पूजन करून उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी पुढील वर्षी महिला गोविंदा पथकांना अधिक मोठ्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याची घोषणा केली.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही उत्सवाला भेट देऊन गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
म्हसळा,रोहा, कोलाड,पन्हाळगड आदी भागांतील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पाच,सहा आणि सात थरांची यशस्वी सलामी देत उपस्थित हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. म्हसळा कुंभारआळी, गवळवाडी-बेलदार समाज, खारगाव बुद्रुक तसेच पन्हाळगड महिला गोविंदा पथकांनी पाच थरांची सलामी दिली. पन्हाळगड पुरुष गोविंदा पथकाने सहा थरांची तर म्हसळा शहर महिला गोविंदा पथक आणि गणेशनगर महिला गोविंदा पथकाने तीन थरांची सलामी देत दहीहंडी उत्सवात रंगत आणली.
दहीहंडीच्या थराराबरोबरच अभिनेत्री स्नेहलता वेसावकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कोळीगीत संगीत रजनीने उत्सवाची रंगत आणखी वाढवली. कोळीगीतांच्या तालावर गोविंदा पथकांसह हजारो म्हसळेकरांनी नाच-गाण्याचा मनमुराद आनंद घेतला.गोविंदा स्पर्धेत यशस्वी सलामी देणाऱ्या पथकांचा आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांच्या पुढाकाराने मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
बालगोविंदा इरा सानप ठरली आकर्षण
संभे गोविंदा पथकाने सातव्या थरावर सलामी देताना बालगोविंदा इरा राकेश सानप हिने केलेली कामगिरी विशेष आकर्षण ठरली. तिच्या धाडसी कामगिरीबद्दल आयोजक जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी ११ हजार १११ रुपयांचे,तर माजी सभापती नाझीम हसवारे यांनी ५ हजार रुपयांचे वैयक्तिक बक्षीस देऊन तिचा गौरव केला.म्हसळ्यात प्रथमच एवढ्या मोठ्या स्वरूपात आणि मोठ्या बक्षिसांच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. थरारक गोविंदा सलामी, ढोल-ताशांचा गजर,कोळीगीतांची मैफल आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण म्हसळा शहर दहीहंडीच्या उत्साहात न्हाऊन निघाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती नाझीम हसवारे,जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जीप सदस्य अनिल बसवत, सभापती बबन मनवे,उपसभापती लहू म्हात्रे,नगराध्यक्ष सुनील शेडगे,माजी सभापती छाया म्हात्रे, नगरसेविका जयश्री कापरे, शाहिद उकये, मंगेश म्हशीलकर, नगरसेविका सरोज म्हशीलकर, नगरसेवक अनिकेत पानसरे, महिला अध्यक्षा मीना टिंगरे,सोनल घोले,रेश्मा काणसे,सरपंच रश्मी सावंत, युवती अध्यक्षा घोसाळकर,गणाध्यक्ष सतीश शिगवण,किरण पालांडे,महेश घोले,नाना सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन किरण खोत आणि तालुकाध्यक्ष समीर बनकर यांनी केले.









