कुंभार आळीतील श्रीकृष्ण मंदिरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष
वार्ताहर -राम भोस्तेकर लोणेरे
माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील कुंभार आळी परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात ग्रामस्थांनच्या उपस्थित साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोरेगावसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीकृष्णाचे दर्शन घेतले.
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी ७ वाजता श्रीकृष्ण अभिषेकास प्रारंभ झाला. गावातील अनेक भाविक आपल्या घरातील श्रीकृष्णाची मूर्ती मंदिरात घेऊन आले होते. मंदिरात भाविकांनी आपापल्या श्रीकृष्ण मूर्तींवर विधिवत अभिषेक करून पूजा-अर्चना केली. यामुळे सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.अभिषेक व पूजाविधीनंतर श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. महापूजेत भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला. दिवसभर गोरेगावातील तसेच परिसरातील भाविक श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येत होते. मंदिर परिसरात भक्तीगीत, नामस्मरण आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर कृष्णमय झाला होता.
मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा जल्लोष
रात्री १० वाजता श्रीकृष्ण जन्मासाठी भजन-कीर्तनाला सुरुवात झाली. भाविकांनी भजनाच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या नामाचा जयघोष केला. जसजशी मध्यरात्र जवळ येत गेली, तसतसा भाविकांचा उत्साह वाढत गेला.
अखेर रात्री १२ वाजून ३५ मिनिटांनी श्रीकृष्ण जन्माचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ‘नंद घर आनंद भयो, जय कन्हैयालाल की’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. फुलांची उधळण, आरती आणि श्रीकृष्ण नामाच्या जयघोषात जन्मोत्सवाचा आनंद भाविकांनी अनुभवला.
गोपाळकाल्यालाही मोठा उत्साह
श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी गोरेगावात गोपाळकाला उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील प्रत्येक घरासमोर दहीहंडी तसेच नवसाच्या हंड्या बांधण्यात आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीने गावातील तरुण, बालगोपाल आणि नागरिकांनी गोपाळकाल्यात सहभाग घेतला.दुपारी सुमारे १ वाजता गावातील गोपाळकाला कार्यक्रमाला सुरुवात झाली. विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांचा गजर, ‘गोविंदा आला रे आला’च्या घोषणा आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
सुमारे संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत गोपाळकाला व दहीहंडीचा उत्सव उत्साहात सुरू होता. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला.
उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या महाप्रसादाचा लाभ गावातील भाविक व नागरिक मोठ्या श्रद्धेने घेतात.
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला या दोन्ही उत्सवांमुळे गोरेगावातील कुंभार आळी परिसरासह संपूर्ण गावात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. धार्मिक परंपरा आणि गावातील एकोपा जपत हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असे ग्रामस्थांनी सागितले.








