प्रतिनिधी – माणगाव
दृढनिश्चय, अथांग मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थितीवर मात करत ग्रामीण भागातील मुलेही गगनभरारी घेऊ शकतात, याचे मूर्तिमंत उदाहरण रायगडच्या मातीत घडले आहे. रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा उणेगावची माजी विद्यार्थिनी व सध्या नवोदय विद्यालयात शिकत असलेली कु. अक्षरा स्वप्नाली वैभव सुर्यवंशी हिने १७ व्या नवोदय विद्यालय समिती राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा २०२६ मध्ये दैदिप्यमान यश मिळवत सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे तिची देशपातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या SGFI (School Games Federation of India) स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उदयपूर (राजस्थान) येथे १ ते ३ सप्टेंबर २०२६ दरम्यान पार पडलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील निवडक आणि मातब्बर खेळाडू सहभागी झाले होते. बुद्धिबळाच्या ६४ घरांच्या पटावर अक्षराने आपल्या अचूक खेळी, शांत संयम आणि भेदक रणनीतीने प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
जिल्हा परिषद शाळेची शिदोरी ते राष्ट्रीय व्यासपीठ
अक्षराचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा उणेगाव येथे झाले. ग्रामीण भागातील याच शाळेत तिच्यातील बुद्धिमत्तेला दिशा आणि गती मिळाली. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे खंबीर पाठबळ यांच्या जोरावर तिने आधी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला आणि आता थेट राष्ट्रीय स्तरावर स्वतःचा ठसा उमटवला. तिच्या या यशामुळे जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तेवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटली आहे.
गावात कौतुकाचा वर्षाव
अक्षराच्या या सुवर्णमय यशामुळे उणेगावसह संपूर्ण माणगाव तालुक्यात आणि रायगड जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका ग्रामीण भागातील मुलीने राष्ट्रीय स्तरावर मारलेली ही मजल परिसरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अक्षराच्या या ऐतिहासिक यशाबद्दल ग्रामपंचायत उणेगाव,उणेगाव शाळेचे शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि क्रीडा रसिकांकडून तिचे, तिच्या पालकांचे व देशपांडे चेस अकॅडमीचे मार्गदर्शक तुषार किशोर देशपांडे सरांचे उत्स्फूर्त अभिनंदन केले जात असून, आगामी SGFI राष्ट्रीय स्पर्धेतही अशीच सुवर्णमय कामगिरी करण्यासाठी तिच्यावर कौतुकाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.










