गुणवंत शिक्षकांचा गौरव; राष्ट्रनिर्मितीतील शिक्षकांच्या योगदानाचे नामदार पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून कौतुक
गोरेगाव – प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यांतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा’ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी शिक्षकांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. भावी पिढी घडविणारे, विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे आणि समाजाचा पाया मजबूत करणारे शिक्षक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते आहेत, असे त्यांनी नमूद केले.
दक्षिण रायगड तसेच संपूर्ण कोकण विभागातील कर्तव्यदक्ष, गुणवंत आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याचा हा सोहळा अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कार प्राप्त सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य करत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करून त्यांना भविष्यातील जबाबदार नागरिक बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. त्यामुळे शिक्षकांच्या कार्याचा सन्मान होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, शिक्षकांच्या अडचणी, त्यांच्या न्याय्य मागण्या तसेच शाळांच्या विकासासाठी शासन म्हणून आम्ही नेहमीच शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना दिला. शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे संस्थापक तथा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, विविध मान्यवर तसेच कोकण विभागातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा हा सोहळा शिक्षकवर्गासाठी प्रेरणादायी ठरला.















