डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा २८वा दीक्षांत समारंभ ३ सप्टेंबरला
माणगाव प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेचा २८वा दीक्षांत समारंभ गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या पदवीका सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती विष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा गौरवशाली सोहळा संपन्न होणार आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्तृत्वाचा गौरव करणारा हा सोहळा ठरणार आहे. यावेळी सुवर्णपदक प्राप्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार असून, कुलपती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार असून, यावेळी ते विद्यापीठाचा अहवाल सादर करणार आहेत.
विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या समारंभात पदवी प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या संधींची दारे खुली करणारा हा पदवीदान सोहळा विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
भव्य कार्यक्रमाची रूपरेषा
दीक्षांत समारंभाची सुरुवात विद्वज्जनांच्या मिरवणुकीने होणार आहे. त्यानंतर राष्ट्रगान, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात येईल. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, कुलगुरूंचा अहवाल, पदवी प्रदान समारंभ, मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रमुख अतिथींचे दीक्षांत भाषण आणि कुलपतींचे अध्यक्षीय भाषण असा कार्यक्रमाचा क्रम राहणार आहे. अखेरीस पसायदान व राष्ट्रगीताने समारंभाची सांगता होईल.
हा दीक्षांत समारंभ प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आला असून विद्यापीठाच्या YouTube माध्यमातून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
थेट प्रक्षेपण :
https://youtube.com/live/j31ydlYMFbo
या कार्यक्रमाचे निमंत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अमित शेष आणि परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामुणकर आहेत. कार्यक्रमास कार्यकारी व विद्या परिषदेचे सदस्य, विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दीक्षांत समारंभास उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांनी सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृहात स्थानापन्न होणे आवश्यक असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.
“ज्ञानाचा गौरव – कर्तृत्वाचा सन्मान – भविष्याची नवी सुरुवात” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.








