श्रीवर्धनच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव; अध्यापनासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीत दिले मोलाचे योगदान
श्रीवर्धन : प्रतिनिधी सोपान निंबरे
तब्बल २६ वर्षे ज्ञानदानाचे व्रत जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या श्रीवर्धन येथील रविंद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सहायक शिक्षक प्रदीप महादेव रिकामे सर यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेला विभागीय स्तरावर मानाची पावती मिळाली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी गोरेगाव, माणगाव येथील ना. म. जोशी विद्या भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भरतशेठ गोगावले, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते प्रदीप रिकामे सरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२६ वर्षांची अखंड ज्ञानसेवा
प्रदीप रिकामे सर गेल्या २६ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते अध्यापन मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
अध्यापनातील सातत्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता, विविध शैक्षणिक उपक्रमांतील सहभाग आणि सामाजिक बांधिलकी अशा विविध पैलूंची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
‘हा सन्मान माझ्या प्रतिष्ठेचा आणि स्वाभिमानाचा विषय’
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना प्रदीप रिकामे सर म्हणाले, “२६ वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली. आपल्या कामाची दखल घेऊन मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार माझ्या कार्याची पावती असून माझ्या प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाचा विषय आहे.”
शिक्षकाच्या हातून घडणारा विद्यार्थी हा केवळ परीक्षेतील गुणांपुरता मर्यादित नसतो, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाची घडणही तितकीच महत्त्वाची असते, या भावनेतून रिकामे सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात अध्यापनाची वाटचाल केली. त्यांच्या याच कार्याला मिळालेला कोकण विभागाचा सन्मान हा त्यांच्या २६ वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव मानला जात आहे.
प्रदीप रिकामे सरांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे रविंद्र नारायण राऊत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयासह संपूर्ण श्रीवर्धन तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच तालुक्यातील शिक्षणप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








