प्रशासकीय कार्यतत्परता व उल्लेखनीय योगदानाची दखल; पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत सन्मान
श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धनच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत रविंद्र ना. राऊत माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक अभय अनंत शेलार यांना राज्यस्तरीय आदर्श वरिष्ठ लिपिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी ना. म. जोशी विद्यालय, गोरेगाव (रायगड) येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अभय शेलार यांना त्यांच्या प्रशासकीय कार्यातील योगदान, कार्यतत्परता आणि जबाबदारीची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमदार भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अभय शेलार यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शैक्षणिक संस्थेतील प्रशासकीय कामकाजात शिस्त, अचूकता, जबाबदारीची जाणीव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे अभय शेलार यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असतानाच विविध शैक्षणिक व संस्थात्मक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श वरिष्ठ लिपिक पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्याने अभय शेलार यांच्या कार्याला नवी प्रतिष्ठा मिळाली असून, हा सन्मान श्रीवर्धनच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीही गौरवास्पद ठरला आहे.
या पुरस्काराबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच श्रीवर्धन परिसरातून अभय शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








