केलटे गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किसन जावळे यांची घेतली भेट
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील केलटे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमीन व्यवहार नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने झाल्याचे आढळल्यास आणि शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्यास फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिले आहेत. केलटे गावातील शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असता भेटी दरम्यान त्यांनी निर्देश दिले. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. अनेक शेतकऱ्यांना मोजणीपूर्वी कायदेशीर नोटीस देण्यात आली नसल्याचे तर काही प्रकरणांमध्ये मोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटीस देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. अभिलेखांमध्ये चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदवणे, काही शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना माहिती न देता हद्द कायम करणे, हद्द कायम आदेशांमध्ये सही, शिक्का अथवा आवश्यक प्रमाणिकरणा बाबत प्रश्न निर्माण होणे तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अनिमयता प्रकरणात मोजणी नोटिसा, उपस्थिती नोंद, पंचनामे, हद्द कायम आदेश, जमीन नकाशे तसेच संबंधित इतर कागदपत्रांची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत हद्द कायम करण्याच्या पुढील कार्यवाही सह जमिनीच्या नोंदींमध्ये कोणताही बदल करू नये अशी मागणी करण्यात आली.
केलटे ग्रामस्थांचे तक्रार निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेता नियमबाह्य अथवा चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी-विक्री झाल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्यास आणि खोटी कागदपत्रे तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी असे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी ग्रामस्थांना दिल्याचे सांगण्यात आले.
भेटी वेळी केलटे गावातील शेतकरी देवेंद्र मेढेकर, चेतन तांबे, विनायक जाधव, राजेंद्र जाधव, कुंदन गायकवाड, बाळकृष्ण मेढेकर, अशोक जाधव, समीर जाधव, जितेंद्र मेढेकर, मंदार जाधव, चंद्रकांत मेढेकर, भरत जाधव, संजीव तांबे, अनंत जाधव यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.








