श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे व कोलमांडले येथील शाळांमध्ये प्राची माईन्सच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन वह्या तसेच दप्तर (बॅग) वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
शिक्षणाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना त्याचा हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वह्या व दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत प्राची माईन्सच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारे तसेच शैक्षणिक साहित्याची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारे असे उपक्रम सातत्याने राबविणे गरजेचे आहे. प्राची माईन्सच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याबरोबरच शिक्षणाबद्दल सकारात्मक प्रेरणाही मिळाली.
या वेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच प्राची माईन्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.










