देवळी गावच्या सुपुत्राची प्रेरणादायी यशोगाथा; आई-वडिलांच्या स्वप्नाला दिले यशाचे रूप
माणगाव प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील देवळी गावचे सुपुत्र श्री. रुपचंद शांताराम सुतार यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षा २०२६ उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे देवळी गावासह संपूर्ण माणगाव तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास न सोडता मोठे यश संपादन करता येते, याचा आदर्श त्यांनी आपल्या कर्तृत्वातून समाजासमोर ठेवला आहे.
रुपचंद सुतार हे चार भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे. त्यांचे वडील शांताराम सुतार हे पारंपरिक सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. मात्र, या आर्थिक अडचणींनी सुतार कुटुंबाची स्वप्ने कधीच मोडली नाहीत.
रुपचंद यांच्या आई शोभा शांताराम सुतार यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झाले आहे. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांनी स्वतःच्या आयुष्यात अनुभवले होते. ‘आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आपल्या कुटुंबाची गरिबी कायमची दूर करावी,’ ही खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्या चारही मुलांना शिक्षण द्यायचे, असा निर्धार त्यांनी केला.
मोठ्या भावाने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून लहान वयातच नोकरीला सुरुवात केली आणि आई-वडिलांना आर्थिक हातभार लावला. दुसऱ्या भावाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून परदेशातील सिंगापूर येथे आपले करिअर स्थिर केले, तर आणखी एका भावाने इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली. या चारही भावंडांच्या यशामागे आई-वडिलांचा त्याग आणि शिक्षणाबद्दलची त्यांची दूरदृष्टी होती.
याच कुटुंबातील रुपचंद यांनी मात्र परिस्थितीशी दोन हात करत आपल्या आयुष्याची वेगळीच वाट निर्माण केली. बारावीनंतर घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना महाविद्यालयीन शिक्षण काही काळ थांबवावे लागले. मात्र त्यांनी शिक्षणाची इच्छा सोडली नाही. मुंबई येथे त्यांनी एका इमारतीच्या गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी स्वीकारली. दिवसभर नोकरी आणि त्यानंतर शिक्षण तसेच पोलीस भरतीची तयारी, असा त्यांचा संघर्ष सुरू झाला.
सन २००५ मध्ये त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात राज्य राखीव पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून त्यांची निवड झाली. या यशाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. मात्र, ‘इथेच थांबायचे नाही’ असा निर्धार त्यांनी केला.
आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सांभाळत पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. या प्रयत्नात त्यांना दोन वेळा अपयश आले. मात्र अपयशाने खचून न जाता त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली. सातत्याने अभ्यास, नोकरीची जबाबदारी आणि परीक्षेची तयारी अशी तारेवरची कसरत करत त्यांनी अखेर पोलीस उपनिरीक्षक विभागीय परीक्षा २०२६ उत्तीर्ण केली.
त्यांच्या या यशामागे केवळ अभ्यास नाही, तर अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग, संयम आणि आई-वडिलांच्या स्वप्नाची प्रेरणा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सुरुवात करून पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक असा त्यांनी केलेला प्रवास अनेक तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.
परिस्थिती कधीही आपल्या स्वप्नांपेक्षा मोठी नसते; जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर कोणत्याही अडचणीवर मात करता येते,’ हा संदेश रुपचंद सुतार यांच्या यशोगाथेतून अधोरेखित होतो.
पोलीस सेवेत कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या गावाशी असलेली नाळ कायम जपली आहे. देवळी गावातील सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत आले आहेत. गावातील सण-उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेण्याची त्यांची भूमिका ग्रामस्थांनी नेहमीच कौतुकाने पाहिली आहे.
गावातील तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता शिक्षण पूर्ण करावे, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि आपल्या कुटुंबाबरोबरच गावाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे, ही त्यांची कायमची भूमिका आहे. देवळी गाव सुजलाम्-सुफलाम् व्हावे आणि गावातील तरुणांनी आपल्या कर्तृत्वाने गावाचे नाव उज्ज्वल करावे, हे त्यांचे स्वप्न आहे.
रुपचंद सुतार यांच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतील यशामुळे त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न साकार झाले आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने संघर्षाच्या वाटेवरून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत आपल्या कुटुंबाचे, गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देवळी ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या जिद्दीची आणि संघर्षाची ही प्रेरणादायी कहाणी ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना आणि तरुणांना निश्चितच नवी उमेद देणारी ठरणार आहे.










