ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक व इंग्रजी भाषेचे आधुनिक शिक्षण देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
माणगाव/प्रतिनिधी
भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद दहिवली मराठी शाळेत अत्याधुनिक इंग्रजी लॅबचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. माणगाव पंचायत समिती सदस्या अलका सुभाष केकाणे यांच्या शुभहस्ते या इंग्रजी लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, त्यांना संगणक वापराचे प्राथमिक व आवश्यक ज्ञान मिळवून देणे तसेच इंग्रजी भाषेतील वाचन, लेखन, संभाषण आणि आकलन कौशल्य विकसित करणे, या दुहेरी उद्देशाने रायगड जिल्ह्यातील तब्बल १२२ शाळांमध्ये इंग्रजी लॅबचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी सुभाष केकाणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आधुनिक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी संगणक आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्घाटनानंतर श्रीयेश कुमार काटे यांनी इंग्रजी लॅबमधील विविध सुविधांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. संगणकाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे शिक्षण कशा पद्धतीने अधिक सोपे, मनोरंजक आणि प्रभावी करता येते, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या आधुनिक शिक्षण पद्धतीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली.
या कार्यक्रमास दहिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मुमताज बंदरकर, गावचे पोलीस पाटील चंद्रकांत चेरफळे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेश सत्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयेंद्र सत्वे, केंद्र समन्वयक संदीप शेंबाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, युवक मंडळाचे सदस्य, इसाक सनगे, इस्माईल तालसुलकर, शादाब गैबी, ग्रामस्थ मंडळाचे सदस्य, पालकवर्ग, विद्यार्थी, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रद्धा अंबुर्ले तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
ग्रामीण शिक्षणाला मिळणार आधुनिकतेची जोड
दहिवली मराठी शाळेत सुरू करण्यात आलेली इंग्रजी लॅब ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवे दालन ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळणार आहे.








