श्रीवर्धन प्रतिनिधी : सोपान निंबरे
श्रीवर्धन तालुक्यातील रानवली ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून श्रीवर्धनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामपंचायतीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार तटकरे यांनी सरपंच सुरेश मांद्यकर यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासोबतच पारदर्शक कारभार, स्वच्छता, पाणी संवर्धन, लोकसहभाग, विकासकामे आणि ग्रामविकासाच्या विविध निकषांवर कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. या विविध निकषांमध्ये प्रभावी कामगिरी करत रानवली ग्रामपंचायतीने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले.
या यशामागे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांचा एकत्रित सहभाग आणि प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. ‘समृद्ध गाव, समृद्ध पंचायत, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला प्रत्यक्ष विकासकामांची जोड देत रानवली ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची शासनस्तरावर दखल घेतली गेली आहे.
रानवली ग्रामपंचायतीचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक हा केवळ ग्रामपंचायतीच्या शिरपेचातील मानाचा तुरा नसून, श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण विकासासाठी काम करणाऱ्या सर्वांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे. रानवली ग्रामपंचायतीने मिळवलेले हे यश तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी निश्चितच प्रेरणादायी आदर्श ठरणार आहे.








