ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुकर व्हावा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला गती मिळावी, या उद्देशाने पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने आपल्या CSR उपक्रमांतर्गत यंदाही दफ्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतला. गेल्या चार वर्षांची यशस्वी परंपरा कायम राखत कंपनीने या वर्षी माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबवला. आत्तापर्यंत एकूण ५७१६ शालेय साहित्य संच वितरीत केले आहेत.
वाढती महागाई आणि ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन कंपनीने यंदा माणगाव तालुक्यातील ८९ शाळांमधील विद्यार्थ्यांना एकूण २,००९ शालेय साहित्य संच अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वितरित केले. या मदतीमुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
या उपक्रमांतर्गत केवळ साहित्य देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांचा अभ्यास करून संच तयार करण्यात आले होते. यामध्ये दप्तर, वह्या, अंकलिपी, १२ पेन्सिलचा संच, पट्टी, रबर, शार्पनर, रंगीत पेन्सिल, चित्रकला वही, स्टीलची पाण्याची बाटली, गिरवायची पाटी यांसारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश होता.
या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी पोस्कोच्या या संवेदनशील प्रयत्नांचे मनापासून स्वागत केले. “ग्रामीण भागात अनेकदा योग्य साधनांअभावी मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात. अशा वेळी पोस्कोसारख्या जबाबदार कंपनीने पुढे येऊन केलेली ही मदत विद्यार्थ्यांचा अभ्यासामधील रस आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवणारी ठरत आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.
हा संपूर्ण उपक्रम स्थानिक शाळा आणि शिक्षण विभागाच्या समन्वयाने पार पडला. पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन मुलांशी संवाद साधला आणि साहित्य वाटप केले.
उपक्रमाबाबत बोलताना कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “शिक्षण हा समाज विकासाचा मुख्य आधार आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या स्वप्नांना बळ देणे ही आमची सामाजिक जबाबदारी आहे. जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासोबतच मुलांचा आत्मसन्मान वाढवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.”
पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या वतीने केवळ शालेय साहित्यच नव्हे, तर जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती व बांधकाम, विज्ञान प्रयोग संच (Science Kits), संगणक संच वितरण आणि स्कूल बस सुविधा यांसारखे अनेक उपक्रम नियमित राबवले जातात. येत्या काळातही शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि उपजीविकेच्या साधनांवर लक्ष केंद्रित करून अधिक व्यापक सामाजिक कार्य करण्याचा मानस कंपनीने व्यक्त केला आहे.



















