लोणेरे -प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून, काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी खांडपाले, पहेल आणि टेंमपाले गावांकडे जाणारा सर्व्हिस रोड अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हिस रोड नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, अपघाताची भीती कायम निर्माण झाली आहे.
माणगावकडून तसेच महाडकडून येणाऱ्या वाहनचालकांना खांडपाले, पहेल आणि टेंमपाले या गावांमध्ये जाण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या गंभीर समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा सल्लागार नरेश आहीरे यांनी घटनास्थळी भेट देऊन सर्व्हिस रोडची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना नरेश आहीरे म्हणाले की, “मुंबई-गोवा महामार्गावरील या भागातील सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. शासनाने पुढील १५ दिवसांच्या आत सर्व्हिस रोडची उभारणी अथवा पर्यायी सुरक्षित व्यवस्था केली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने लढा उभारला जाईल. पहेल, खांडपाले आणि टेंमपाले येथील ग्रामस्थांच्या न्याय्य मागणीसाठी पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.”या पाहणी दौऱ्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे , शाखाप्रमुख ज्ञानदेव ढेपे, निजाम भाई गजगे, हिदायत आलसुलर, यशवंत सत्वे, अंकुश मालोरे, राकेश खराडे, निलेश सावंत,यांच्यासह पहेल, खांडपाले व टेंमपाले येथील शिवसैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक नागरिकांनी शासन आणि संबंधित महामार्ग प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांना संबंधित यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.










