माणगाव | प्रतिनिधी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा तसेच निसर्गरम्य ताम्हिणी घाट रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांमुळे वारंवार प्रभावित होत असतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी आज ताम्हिणी घाट परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची सविस्तर पाहणी केली.
यावेळी घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, सुरू असलेली विकासकामे, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी करण्यात आलेले नियोजन, दरडी कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणांवरील संरक्षणात्मक उपाययोजना तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना अपघातप्रवण ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याचे, आवश्यक यंत्रसामग्री सज्ज ठेवण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश दिले. तसेच ताम्हिणी घाटातील रस्ता शक्य तितक्या लवकर प्रवाशांसाठी पुन्हा सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाहणीदरम्यान संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती देत, रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
यावेळी पालकमंत्री भरत गोगावले यांनी नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात ताम्हिणी घाटातून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले. प्रवाशांचा सुरक्षित व सुखकर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महायुती सरकार आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.











