माणगांव (सलीम शेख)
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या फ्रेंड्स ग्रुप महाड तर्फे संस्थेचे संस्थापक सदस्य माजी आमदार कै. माणिकराव जगताप उर्फ आबा यांच्या जयंतीनिमित्त माणगांव नगरपंचायत अग्निशामक दलाच्या टिमचा आकर्षक सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. सदरचा सन्मान माणगाव नगरपंचायतीचे अग्निशामक दल टिमचे फायरमन सारंग कनोजे, मुकादम प्रकाश मोरे, कर्मचारी महेंद्र मोरे व दिनेश मोरे यांनी स्वीकारला.या सन्मानाबद्दल माणगांव नगरपंचायतीचे तसेच फायर टिमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. महाड शहरातील संजय ऑइल ट्रेडींग कंपनीच्या गोदामाला दि. २८ मे २०२६ रोजी लागलेल्या भीषण अग्नीप्रलयाप्रसंगी माणगांव नगरपंचायतीच्या फायर टिममधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे ११ तासांच्या अथक प्रयत्नांनी सदरची आग आटोक्यात आणली होती. संकटाच्या ज्वालांमध्ये धैर्याने सामना करीत या टिमच्या जवानांनी असंख्य जीवांचे रक्षण करीत नि:स्वार्थी कामगिरी बजावली. या माणगाव नगरपंचायतीतील फायर टीमच्या बहाद्दर जवानांचा गौरव म्हणून फ्रेंड्स ग्रुप महाडने माणगावच्या या टिमचा यथोचित सन्मान केला.










