आरोग्य केंद्राची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे आदेश – जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील
म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती व आवश्यक सोयी-सुविधांबाबत रायगड जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आरोग्य केंद्राच्या इमारतीची आवश्यक दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ रायगड, सुंदर रायगड’ उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम सभापती मधुकर पाटील, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष बेलमारे यांनी खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला. तसेच आरोग्य केंद्रातील अडचणी आणि आवश्यक सुविधांबाबत माहिती जाणून घेण्यात आली.
खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची आवश्यक डागडुजी व दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षित व योग्य वातावरणात सेवा देता यावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही राजिप उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी दिली.
चौकटीत टाकावे
& जिप सदस्य अभिषेक विचारे यांच्या पाठपुराव्याला यश…
खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभिषेक विचारे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा विषय प्रशासनाच्या पातळीवर गतीने मार्गी लागला असून, स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी म्हसळा पंचायत समिती सभापती बबन मनवे, पंचायत समिती सदस्य प्रियांका निंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंबेत गण अध्यक्ष संतोष सावंत, आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










