सामाजिक, शैक्षणिक आणि रोजगाराभिमुख उपक्रमांचे केंद्र उभारण्याचा संकल्प
माणगाव प्रतिनिधी
माणगावच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीशी अनेक वर्षांपासून नाते जोडलेल्या कुणबी भवनाच्या पुनर्विकासाला आता नवी दिशा मिळाली आहे. माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळ संचलित कुणबी भवनाच्या पुनर्विकासासाठी ऑईल इंडिया कंपनीच्या माध्यमातून १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून भव्य, देखणी आणि अत्याधुनिक वास्तू उभारण्यात येणार असल्याची घोषणा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली.
कुणबी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गालगत उभी राहणारी ही नवी वास्तू भविष्यात केवळ सामाजिक कार्यक्रमांची जागा न राहता समाजाच्या पुढील पिढीच्या स्वप्नांना आकार देणारे केंद्र ठरावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माणगाव तालुका कुणबी समाज विकास मंडळ संचालित कुणबी भवन या सामाजिक वास्तूचा पुनर्विकासाचा भूमीपूजन समारंभ सोमवार दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळ ४ वा. उत्साहात संपन्न झाला. यावेळी खा. तटकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, तालुकाध्यक्ष काका नवगणे, राजिप सदस्य अस्लम राऊत,ज्येष्ठ नेते गजानन अधिकारी,हुसेन रहाटविलकर, रामभाऊ टेंबे,भागोजीबुवा डवले, सहादेव बक्कम,शांताराम भोरावकर,गंगाराम उभारे,माणगाव पंचायत समिती उपसभापती मनिषा मालोरे, पंचायत समिती सदस्या संगीता बक्कम,उपनगराध्यक्ष रिया उभारे,जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शादाब गैबी,माजी सरपंच राजेंद्र शिर्के,माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,संदीप खरंगटे,दिलीप जाधव,माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर,सरपंच शौकत रोहेकर,राजू मोरे, तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,उदय अधिकारी,सतीश पवार,सुभाष गुगले, किशोरी हिरवे आदींसह तालुक्यातून कुणबी समाज बांधव – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.तटकरे पुढे म्हणाले की, आणि समाजबांधवांचे योगदान असल्याचे सांगताना खासदार तटकरे यांनी बाबूराव भोनकर, मारुतीराव बुटे, प्रभाकर उभारे, अशोक दादा साबळे यांच्यासह तत्कालीन समाजबांधवांच्या योगदानाचा गौरव केला.
अनेक वर्षांच्या आठवणी आणि सामाजिक कार्याचा वारसा जपणाऱ्या या वास्तूचा पुनर्विकास होत असल्याने जुन्या पिढीच्या योगदानाला आधुनिक विकासाची जोड मिळणार आहे. भूतकाळाचा वारसा जपत भविष्याच्या पिढीला दिशा देणारे केंद्र म्हणून कुणबी भवन विकसित व्हावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पुनर्विकासानंतर कुणबी भवनाचा उपयोग केवळ विवाहसोहळे, सभा आणि सामाजिक कार्यक्रमांपुरता मर्यादित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. युवकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम येथे राबविता येतील.
आजच्या बदलत्या काळात समाजातील तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. त्या दृष्टीने कुणबी भवनाची नवी वास्तू ज्ञान, कौशल्य आणि सामाजिक प्रगतीचे व्यासपीठ बनू शकते.
माणगाव शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विकास आवश्यक असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले. रस्ते, वाहतूक, रेल्वे आणि नागरी सुविधांच्या विकासावर भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
माणगाव परिसरातील बायपास रस्ते, इंदापूर-माणगाव जोडरस्ते तसेच दक्षिण रायगडमधील विविध महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाचा त्यांनी उल्लेख केला. या सुविधांमुळे माणगावच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
रोहा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित आधुनिकीकरणासाठी ५५ कोटी रुपयांच्या कामाचा उल्लेखही यावेळी करण्यात आला. माणगाव, रोहा आणि दक्षिण रायगडमधील दळणवळण अधिक सक्षम झाल्यास या परिसरातील विकासाच्या संधी वाढू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
कुणबी भवनाच्या पुनर्विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कारण ही वास्तू केवळ सिमेंट-विटांची इमारत नसून अनेक पिढ्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे.
आज तिच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना नवा स्पर्श मिळत असताना, नव्या पिढीच्या आकांक्षांनाही नवी जागा मिळणार आहे. शिक्षण, रोजगार, कौशल्य आणि सामाजिक प्रगतीच्या दिशेने समाजाची वाटचाल अधिक व्यापक करण्यासाठी या वास्तूचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वास्तूचा पुनर्विकास नव्हे, नव्या पिढीच्या स्वप्नांना आकार देण्याचा संकल्प!
१ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून होणारा कुणबी भवनाचा पुनर्विकास हा केवळ एका वास्तूच्या नूतनीकरणाचा विषय नाही; तर सामाजिक वारसा, वर्तमानाची गरज आणि भविष्यातील पिढीची स्वप्ने यांना एकत्र आणण्याची संधी आहे.
ज्येष्ठांनी उभा केलेला पाया आणि नव्या पिढीची स्वप्ने यांची सांगड घालत उभी राहणारी ही नवी वास्तू माणगावच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना तालुका कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष महादेवराव बक्कम म्हणाले की,
१६ ऑगस्ट १९९८ साली कुणबी समाज साले ग्रुपचा गुणगौरव सोहळा साले येथील गणपती मंदिरात खा.तटकरे साहेबांच्या उपस्थितीत झाला होता. त्या कार्यक्रमात मी माणगाव शहरात कुणबी समाजाची वास्तू असावी अशी इच्छा तटकरे साहेबांकडे व्यक्त केली होती. याकडे लक्ष देत तटकरे साहेबांच्या प्रयत्नांनी माणगावात ही कुणबी भवनाची वास्तू त्याकाळात उभी राहिली. आज या वास्तू असून २८ वर्ष झाली असून पुन्हा एकदा या वास्तूला तटकरे साहेबांनी समाजाच्या भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगत बक्कम यांनी तालुका कुणबी समाजाच्यावतीने खा.तटकरे यांचे मनापासून ऋण व आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सदस्य तथा माजी सरपंच राजेंद्र शिर्के यांनी केले तर मंडळाचे सरचिटणीस रामभाऊ टेंबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली.








