माणगाव | विशेष प्रतिनिधी
वाढदिवसाचा वायफळ खर्च आणि बडेजाव टाळून सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम श्री साई इंटरप्रायजेसचे मालक शैलेश शंकर खराडे यांनी राबविला. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रायगड जिल्हा परिषदेची ‘उत्कृष्ट शाळा’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उणेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शैलेश खराडे हे आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त वस्तूंचे वाटप करत सामाजिक बांधिलकी जपत आहेत. यंदाही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला निश्चितच प्रेरणा मिळणार असून त्यांचा अभ्यासावरील उत्साह अधिक वाढणार आहे.
या प्रसंगी शैलेश खराडे यांच्या सौभाग्यवती ऋतुजा शैलेश खराडे तसेच भगिनी सानिया शंकर खराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या खराडे कुटुंबाबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि विद्यार्थ्यांनी शैलेश खराडे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “वाढदिवसानिमित्त मिळालेली ही प्रेमाची भेट विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” अशा भावना व्यक्त करत त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.




