छत्रपती संभाजीनगर : दिल्लीतील जंतरमंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सरकारला संवेदनशीलपणे हाताळता आले असते. पण तसे झाले नाही. पोलिसांनी लाठीमार तर केलाच अगदी बंदूकही चालवली. केवळ एका मंत्र्याला वाचविण्यासाठी सुरू असणारी कसरत निषेधार्ह आहे. यातून लोकशाहीचे खच्चीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. याचा निषेध नोंदिवण्यासाठी २३ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘ महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली आहे. आपापल्या मुलांचे भवितव्य जपायचे असेल तर सर्वांनी पक्ष, संघटना, विचारधारा या सर्वांना बाजूला ठेवून बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी मंगळवारी केले. दिल्लीतील जंतरमंतरवर होणाऱ्या आंदोलनाचे नेतृत्व छत्रपती संभाजीनगरचे अभिजीत दिपके करत आहे. त्यामुळे मराठवाड्यातून या तरुणांना समर्थन देण्यासाठी बंद यशस्वी व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहे. शहरातील क्रांती चौकात नुकत्याच झालेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी , स्पर्धा परीक्षांचे उमेदवार सहभागी झाले होते. शिक्षण व्यवस्थेत बदल करावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे की नाही, हे पालकांनी स्वत:ला विचारावे आणि ‘ बंद ’ मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रवक्ते मोकळे यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण गेल्या काही वर्षापासून शिक्षण व्यवस्थेलाच कीड लागली आहे. ज्या शैक्षणिक संस्थामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो तिथे शिकवलेच जात नाही. शिकवणी वर्गाचा सर्वत्र सुळसुळाट आहे. या विरोधात हा बंद आहे. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्याची हीच वेळ असल्याने आणि सत्ताधाऱ्यापर्यंत त्यांचा आवाज पोहचावा म्हणून हे आंदोलन हाती घेतले असल्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मांडण्यात आली. राज्यातील बहुतांश विरोधी पक्षातील नेत्यांनी आता दिल्ली येथे जात आंदोलनास समर्थन दिले. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अभिजीत दिपके यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनीही आंदोलनास भेट दिली. या आंदोलनास पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

