माणगाव (विशेष प्रतिनिधी): माणगाव नगरपंचायत हद्दीतील भादाव गावचे रहिवासी, आरोग्य सेवक तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, माणगाव तालुक्याचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र दगडू खाडे यांनी एलएलबी ही मानाची पदवी संपादन करून वकिलीच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व प्रशासकीय स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अॅड. राजेंद्र खाडे यांचे वकील होण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि ध्येयाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न नामदेव सुर्वे विधी महाविद्यालय, नाणोरे (ता. माणगाव, जि. रायगड) येथून बीएससीनंतर एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी वकिलीची पदवी संपादन केली.
राजेंद्र खाडे हे एक कर्तव्यदक्ष आरोग्य सेवक असून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, माणगाव तालुक्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते बहुजन समाजात सामाजिक बांधिलकी जपत तसेच जातीय सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी माणगाव तालुका व रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे कार्यरत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्य सेवक म्हणून उल्लेखनीय कार्य केले. गावागावांत जाऊन नागरिकांना कोविड-१९ संदर्भात जनजागृती, मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सेवा देत त्यांनी कोविड योद्धा म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. जनसेवा आणि समाजकार्याची त्यांना विशेष आवड असून सर्वसामान्यांच्या मदतीसाठी ते नेहमी तत्पर असतात.
त्यांनी वकिलीची पदवी संपादन केल्यामुळे समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आपल्या यशाबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अॅड. राजेंद्र खाडे म्हणाले, “सर्वांच्या आशीर्वादामुळे मी शिक्षणाचा प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. वकील होण्याची माझी मनापासून इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाल्याचा मला मनस्वी आनंद आहे. माझ्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत ज्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले, त्या सर्वांचा मी मनःपूर्वक ऋणी आहे.
अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठवणे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हीच शिकवण मला माझ्या गुरूंकडून मिळाली आहे. याच मूल्यांच्या आधारावर मी पुढील काळात वकिली व्यवसायातून समाजसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे.”



