‘
“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे स्वप्न असते. आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित, सर्व सोयी-सुविधांनी सज्ज आणि गुणवत्तेच्या बाबतीत माणगाव तालुक्यात अग्रेसर असलेली जिल्हा परिषदेची उणेगाव शाळा पाहून माझे मन भरून आले आहे. आपल्या ग्रामीण भागातील मुलांचे भविष्य घडवणाऱ्या अशा आदर्श शाळा महाराष्ट्राच्या खेडोपाडी निर्माण झाल्या पाहिजेत,” असा अत्यंत प्रेरणादायी आणि भावस्पर्शी आशावाद देवळी गावचे सुपुत्र, उद्योजक तथा दानशूर सामाजिक कार्यकर्ते रोहनजी अशोक साळवी यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्हा परिषदेच्या ‘उत्कृष्ट शाळा-उणेगाव’ येथे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुखकर व सक्षम व्हावा, या उदात्त हेतूने रोहन साळवी यांच्या वतीने भव्य शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्गातील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि शाळेची शिस्त पाहून त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले.तसेच शाळेत सध्या चालू असलेल्या सोलार सिस्टीमला बॅटरी बॅकअप कमी पडत असल्याने एक बॅटरी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या कौतुकास्पद आणि मंगलप्रसंगी आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त रोहन साळवी, स्वप्नील साळवी आणि रोहित सकपाळ,पत्रकार रिझवान मुकादम,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुदेव सत्वे आणि उपाध्यक्ष मंगेश शिंदे,ग्रामपंचायत सदस्या स्मरणिका जुमारे, कविता चेरफळे आणि सानिया सत्वे तसेच शाळेचे मुख्याध्यापक, संपूर्ण शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि लाडके विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गुणवत्तेला दिलेली ही मायेची आणि साहित्याची जोड विद्यार्थ्यांच्या मनात नवी उमेद निर्माण करून गेली. रोहन साळवी यांच्या या दातृत्वाबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व समस्त उणेगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद मानण्यात आले, तसेच त्यांच्या भावी सामाजिक व शैक्षणिक कार्यास अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.





