प्रतिनिधी महाड
दक्षिण रायगडच्या आरोग्यसेवेला नवी दिशा देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाड येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज झाले असून आज या विविध अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा अभाव या दोन मोठ्या समस्यांवर तोडगा म्हणून महाड ग्रामीण रुग्णालयात मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, सी-आर्म मशीन, मेमोग्राफी रूम आणि ५ खाटांचा अत्याधुनिक आयसीयू वॉर्ड या चार प्रमुख सुविधा रुग्णांच्या सेवेत समर्पित करण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे महाडसह पोलादपूर, माणगाव, कर्जत आणि कोकणातील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महाड ट्रॉमा केअर सेंटर हे मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांसाठी पहिले रेफरल सेंटर आहे. यापूर्वी गंभीर अपघातग्रस्त रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी रायगड, पनवेल किंवा मुंबईला हलवावे लागत होते. आता नव्याने सुरू झालेल्या मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरमध्ये हवा शुद्धीकरण, HEPA फिल्टर, तापमान नियंत्रण आणि जागतिक दर्जाचे निर्जंतुकीकरण असल्याने २४x७ सुरक्षित शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. यामुळे ‘गोल्डन अवर’ वाया न जाता रुग्णांचे प्राण वाचवणे सोपे होईल.
तसेच हाडांच्या शस्त्रक्रियांसाठी अत्यावश्यक असणारी सी-आर्म मशीन देखील कार्यान्वित झाली आहे. फ्रॅक्चर, रॉड टाकणे आणि सांधेरोपणाच्या वेळी रिअल टाइम एक्स-रे इमेजिंगमुळे शस्त्रक्रियेची अचूकता वाढेल आणि रुग्ण लवकर बरा होईल. यापूर्वी यासाठी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च करून खाजगी रुग्णालयात जावे लागत होते.
महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेली मेमोग्राफी रूम ही दक्षिण रायगडसाठी पहिलीच सुविधा आहे. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचाराचा खर्च ७०% पर्यंत कमी होतो. आता ग्रामीण भागातील महिलांना तपासणीसाठी अलिबाग-मुंबईची धावपळ करावी लागणार नाही. शिवाय ५ खाटांच्या नवीन आयसीयू वॉर्डमुळे गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर, मॉनिटर आणि तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा एकाच छताखाली मिळणार आहे. त्यामुळे उपचारादरम्यान होणारा वेळ आणि पैशांचा अपव्यय थांबणार आहे.
सामान्य कुटुंबाला अपघातानंतर खाजगी हॉस्पिटलचा लाखोचा बिल परवडत नाही. हीच वेदना बघून आम्ही या सुविधा महाडला आणल्या. डॉ. शंतनू डोईफोडे आणि त्यांच्या टीमने गेल्या वर्षी ७०० हून अधिक डिलिव्हरी यशस्वी केल्या आहेत. आता शस्त्रक्रिया आणि कर्करोग निदानही इथेच होणार आहे. या सर्व सुविधा केवळ शासन निधीतून नाहीत, तर CSR अंतर्गत कंपन्यांच्या आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीने उभारल्या आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महाडच्या सभापती प्रेरणा सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र तर्डे, शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, रुग्ण कल्याण समिती सदस्य सिद्धेश पाटेकर, पंचायत समिती सदस्य नूतन मोरे, नगरसेविका सौ. मिलन जाधव, विद्या देसाई, युवा सेना तालुकाप्रमुख रोहिदास आंबवळे, उपतालुकाप्रमुख लक्ष्मण भोसले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.










