म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील 39 ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे जयंती निमित्ताने रायगड जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे यांचे विचारे फाउंडेशन मार्फत महिला व बाळविकास मंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते बसण्याचे बाकडे (बेंच) वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थांना लॅपटॉप व जेष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आयोजित कार्यक्रमात मंत्री आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की दरवर्षी 22 जुलै रोजी ज्यांचा वाढदिवस साजरा करायचो पण दुदैवाने आज त्यांची जयंती साजरी करावी लागते याचे वेदनादायी दुःख क्षणोक्षणाला होत असून आमचा आधारवड हरपला अशा शब्दात भावना व्यक्त करताना मंत्री आदिती तटकरे यांना गहिवरून आले होते. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात लोकप्रतिनिधित्व करताना सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच यांची काही कामे असतील तर ते आमदार किंवा खासदार यांना हक्काने सांगतात ते त्यांचे नेते असतात तसेच आम्ही आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व करताना आमचे सर्वोच्च नेते अजितदादा होते. आज तेच नाहीत याची कल्पना ही करवत नाही. दादांच्या आठवणींना उजाळा देताना संगीतले की दादांनी नेहमीच वृक्ष संवर्धनाकरिता महत्व दिले. त्यांना विविध झाडांची आवड होती. त्यांची हिच आवड आम्ही जोपासणार असून प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या आवारात “देवराई ते देवगिरी” अशा प्रकारची हिरवेगार क्षेत्र तयार करणार असल्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र राज्याला विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्यात दादांचे योगदान खूप मोठे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून त्यांनी नेहमीच श्रीवर्धन मतदार संघाला झुकते माप दिले. खासदार तटकरे साहेब, मी असेल किंवा आमदार अनिकेत भाई असतील आम्हाला कधीही दुरावा दिला नाही. स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांनी मला अनेक गोष्टी शिकविल्या, मार्गदर्शन केले. दादांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील. सर्वच लोकाप्रतिनिधींनी स्व.अजित दादांचे विचार आत्मासात केले पाहिजेत असे आव्हान मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
सभापती बबन मनवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष समिर बनकर,सभापती बबन मनवे, जिप सदस्य अभिषेक विचारे, उपसभापती लहू म्हात्रे, पस सदस्या प्रियांका निंबरे, पस सदस्या समृद्धी चाचले, नगराध्यक्ष सुनील शेडगे, माजी उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी राजू किरवे, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, रेशमा कानसे, गण अध्यक्ष सतिश शिगवण, संतोष सावंत, प्रकाश गाणेकर, महेश घोले, किरण पालांडे, वृषाली घोसाळकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, पंचायत समिती कर्मचारी, ग्रापं कर्मचारी उपस्थित होते.









