माणगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील मोर्बा गावात दररोज रात्रंदिवस विजपुरवठा खंडित होत असल्याने येथील विज ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा वीजग्राहक अकबर बडे व अल्ताफ हर्णेकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना नजीकच्याच काळात विज वितरण कार्यालयावर प्रचंड संख्येने मोर्चा काढीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्बा गावात दररोज रात्रंदिवस होणाऱ्या खंडित विज पुरवठ्यामुळे प्रसार माध्यमांजवळ बोलताना सांगितले कि,बारा दिवसांपूर्वी अशाच प्रकारे मोर्बा गावात दररोज विजपुरवठा खंडित होत होता. त्यावेळी गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत मोर्बा गावातील विज कार्यालयात धडक देऊन तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्यावेळी उपस्थित वीज ग्राहकांनी विज मंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत विज वितरण कंपनीला इशारा दिला होता. त्यानंतर वृत्तपत्रात व विविध समाज माध्यमांवर या गोष्टी प्रसिद्ध झाल्यावर दोन – तीन दिवस सुरळीतपणे मोर्बा गावात विजपुरवठा सुरु होता. परंतु पुन्हा एकदा विज वितरण कंपनीच्या येरे माझ्या मागल्या प्रमाणे काम सुरु आहे. मोर्बा गावात गेली आठ दिवसांपासून रात्रंदिवस पुन्हा विजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होत असून रात्री विजपुरवठा खंडित झाल्याने घरातील आजारी रुग्णांनाही त्याचा त्रास होत आहे. शिवाय विजेवर चालणारी सारी यंत्रणा बंद पडत असल्याने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न व्यवसायिकांना सतावत आहे. वारंवार विजपुरवठा खंडित होत असतानाही दर महिन्याला येणारे विजबिल यामध्ये मात्र कोणतीही तफावत जाणवत नाही. ते विजबिल दर महिन्याला बरोबर येते. वास्तविक वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्याने विजबिल कमी आले पाहिजे तसे मात्र होत नाही. याबाबत मोर्बा गावातील विजवितरण कार्यलयावर गेल्यास तेथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात असे सांगत कोणी ग्राहक विजचोरी करीत असेल तर त्या ग्राहकावर कारवाई करा पण त्यासाठी गावातील हजारो वीजग्राहकांना वेठीस धरू नका. मोर्बेकरांच्या या वीजप्रश्नाकडे विजवितरण कंपनीने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन विजपुरवठा सुरळीतपणे सुरु ठेवावा अन्यथा वीजमंडळावर हजारोंच्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोर्बा गावातील सामाजिक कार्यकर्ते व वीजग्राहक अकबर बडे व अल्ताफ हर्णेकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिला.








