!माणगाव (सलीम शेख)
माणगाव येथील वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल दिपक रामभाऊ शेरकर यांनी आपली मुलगी अधिरा हिचा पाचवा वाढदिवस रविवार दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रम केंद्रातील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करून उत्साहात साजरा केला. दिपक शेरकर यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे माणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रणधीर कनोजे यांनी विशेष कौतुक केले. वाहतूक शाखेचे दिपक शेरकर हे मुंबई-गोवा महामार्गावर आपले कर्तव्य बजावीत असताना वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरू ठेवण्याबरोबरच ते कोणी गरीब गरजू व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांना मदतीचा हात देत असतात. वाहतूक शाखेतील लोकांचा हा माणुसकीपणा वेळोवेळी माणगावकरांनी अनुभवला आहे. असेच एक सामाजिक दायित्व दाखविताना वाहतूक शाखेचे दिपक शेरकर यांनी आपली मुलगी अधिराचा पाचवा वाढदिवस वनवासी कल्याण आश्रम केंद्र उतेखोल – माणगाव येथील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करून आनंदात साजरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत वाहतूक शाखेचे शिवराज बांडे, राजेंद्र बोंबले व रिक्षा युनियनचे सदस्य महेश मारणे उपस्थित होते. दिपक शेरकर यांच्या या उपक्रमाचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी खऱ्या अर्थाने बोध घेऊन गरीब विद्यार्थ्यांमध्ये असा वाढदिवस साजरा केला तर तो वाढदिवस निश्चितच मनाला आनंद देणारा ठरेल.









