म्हसळा – श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा शहरातील विविध रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरावेत तसेच ज्या ठिकाणी रस्त्यावर शेवाळ साचले आहे त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने म्हसळा शहर प्रमुख अभय कळमकर यांनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनिल शेडगे व मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की शहरातील अनेक वार्डांतील रस्त्यांवर खड्डे पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याशिवाय अनेक ठिकाणी रस्त्यावर शेवाळ साचल्याने पाय घसरून पडण्याच्या तसेच दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नगरपंचायतीने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, शेवाळ हटविणे व आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करून रस्ते सुरक्षित करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न केल्यास नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर शिवसेना पक्षाच्या वतीने म्हसळा नगरपंचायत विरोधात रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शहरप्रमुख अभय कलमकर यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ शिवसैनिक अल्प संख्याक सेल प्रमुख शौकत हजवाने, दिपल शिर्के, शहर संघटक अंकुश नटे, विभाग प्रमुख किसन म्हात्रे,नवमान वजगरे, फहद पठाण,समीर लांजेकर आदी सैनिक उपस्थित होते.







