माणगाव – प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित रायगड दौऱ्यापूर्वीच माणगाव तालुक्यात मनसेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे दोन प्रमुख नेते आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी दि. २ ऑगस्ट रोजी शिवसेना शिंदे गट पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रतिक रहाटे तसेच मनसेचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा संपर्काध्यक्ष दिलीप सांगले यांनी माणगाव येथील कुणबी भवन येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री ना. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल नवगणे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश नलावडे, पंचायत समिती सभापती विलास शिंदे, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, निजामपूरचे माजी सरपंच राजाराम रणपिसे, युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, माणगाव तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर उतेकर, शहर संपर्कप्रमुख प्रसाद धारिया, डॉ. अमेय उभारे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेने नुकतीच राज्यभरात पक्षबांधणीला गती देत विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, येत्या काही दिवसांत राज ठाकरे यांचा रायगड दौरा होणार आहे. मात्र, त्याआधीच माणगाव तालुक्यातील दोन प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रतिक रहाटे व दिलीप सांगले यांच्यासोबत निजामपूर व इंदापूर विभागातील अनेक युवा पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि समर्थकांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे हा केवळ दोन नेत्यांचा प्रवेश न राहता मोठ्या प्रमाणावर झालेला सामूहिक पक्षप्रवेश ठरला आहे. पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रतिक रहाटे आणि दिलीप सांगले यांनी पूर्वीच्या पक्षात काम करताना घुसमट होत असल्याची भावना व्यक्त केली. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचा भगवा स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री भरत गोगावले म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तळागाळातील विकासाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे विविध पक्षांतील पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तळा, रोहा, माणगाव आणि श्रीवर्धन नगरपंचायतींसाठी सुमारे नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात ग्रामीण भागासाठीही निधी देण्यात येईल. आरोग्याला हानीकारक कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. रोजगारनिर्मिती करणारे चांगले उद्योग आणण्यासाठी उद्योग मंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्यात येईल. शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व मनसैनिकांना योग्य तो सन्मान दिला जाईल. सर्वांनी एकत्रितपणे पक्षवाढीसाठी काम करावे.”








